भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, अडवाणींवर सर्वांच्या नजरा

0
8

बंगळुरु – भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरु झाली आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह आणि त्यांच्यानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिपप्रज्वलन करुन बैठकीचे उदघाटन केले. बैठकीच्या सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे भाषण होणार आहे. मात्र, पक्षाला चिंता ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींबद्दल आहे. बैठकीला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्या यादीतून अडवाणी यांचे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
अडवाणी बैठकीला मार्गदर्शन करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे वृत्त आहे. याबाबत पक्ष प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. गोव्यात २०१३ मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अडवाणी सहभागी झाले नव्हते. अमित शहा यांच्याकडे पक्षाची सूत्रे आल्यापासून अडवाणी व इतर ज्येष्ठ नेत्यांना तुलनेने प्रतीकात्मक असलेल्या मार्गदर्शन मंडळात स्थान देण्यात आले.
भाजप पदाधिकार्‍यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सदस्य अभियानाबद्दल पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे कौतूक केले होते. हे कौतूक कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाही. पक्षाध्यक्षांबद्दल कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी आहेत, असे असताना मोदी पक्षाध्यक्षांचे कौतूक करतात पण त्यांच्या भाषणात पक्षाची खरी स्थिती समोर येत नाही यामुळे कार्यकर्ते नाराज होते. दिल्लीतील पराभवानंतर संघाने भाजप नेतृत्वाला ग्रासरुट लेव्हलवर काम करणार्‍यांसोबत संपर्क ठेवण्यास सांगितले होते, पण पंतप्रधानांच्या भाषणात त्याचा उल्लेख नव्हता.