अकोट-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या निर्मितीला गती

0
19

अकोला : अकोट-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या निर्मितीला आगामी काळात गती येणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे वळवलेल्या मार्गावरून रेल्वेमार्ग टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली आहे. रेल्वेच्या जागेवर नदीवर पुलाच्या बांधकामालादेखील सुरुवात करण्यात आली आहे.

दक्षिण व उत्तर भारताला जाेडणाऱ्या रेल्वेमार्गामध्ये अकोला ते खंडवा ब्रॉडगेज मार्गाचे काम रखडले होते. राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदींसह १० राज्यांना जोडणारा व कमी वेळेत दिल्ली गाठण्यासाठी सोयीस्कर ठरणारा हा रेल्वेमार्ग पूर्ण होण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांची आग्रही भूमिका आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ब्रॉडगेज रेल्वेमार्ग करण्यात वन्यजीवप्रेमी व पर्यावरणवाद्यांकडून विरोध झाल्याने या मार्गाचे काम प्रलंबित होते.

पर्यायी मार्गामुळे अंतर वाढले

अकोला-खंडवा रेल्वेमार्गात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मोठा अडथळा होता. तो दूर करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाला मंजुरी देण्यात आली. पूर्वी तुकईवरून दबका, धूलघाट, वानरोड, हिवरखेड येथून अडगाव असा रेल्वेमार्ग होता. आता मेळघाट प्रकल्पाच्या बाहेरून तुकईवरून खिकरी, खकनार, उसरनी, जामोद, सोनाला, हिवरखेड मार्गे अडगावला पोहोचणार आहे. पर्यायी मार्गामुळे अंतर वाढले आहे.

अकोला-खंडवादरम्यान अकोला-अकोट मार्गाचे काम पूर्ण झाले असून, आमला खुर्द ते खंडवा मार्गाचे कामाचे काम प्रगतिपथावर आहे. केंद्र व राज्य सरकार १०३ कि.मी.च्या मार्गाला गती देणार आहे. आता अकोट ते आमला खुर्द मार्गाचा अडथळादेखील दूर झाला. या मार्गावरील तुकाई येथे तापती नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात केली आहे.

रेल्वेच्या ताब्यात असलेल्या जागेवर बांधकामाला प्रारंभ करण्यात आला. या मार्गासाठी लागणाऱ्या खासगी जमिनी अधिग्रहण करण्यासाठी भारत सरकारने राजपत्र जाहीर केले. या मार्गावरील कामांसाठी निविदादेखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे इतर कामांनादेखील लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला-खंडवा रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रभावीपणे मांडून व्यापारी, नागरिकांच्या समस्यांशी अवगत केले होते. त्यानंतर या मार्गातील अडचणी दूर होऊन कामाला गती आल्याचे चित्र आहे.