वाघांची शिकार आणि १७ मिश्यांची तस्करीही

0
14

नागपूर : विदर्भात वाघांची संख्या वाढली तरी त्यांना असलेला शिकाऱ्यांचा धोका टळलेला नाही. शिकारीसाठी कधी वीजवाहिन्यांचा तर कधी विषप्रयोगाचा आधार शिकारी घेतात आणि मग वाघांच्या अवयवांची तस्करी केली जाते. अशीच एक तस्करी रोखण्यात वनखात्याला यश आले आहे. शिकार रोखता आली नसली तरीही ती करून अवयवांची विक्री करणाऱ्याला अधिकाऱ्यांनी अटक केली.

नागपूर व भंडारा वनखात्याने संयुक्त कार्यवाही करत वाघांच्या मिश्यासह तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून खात्याला भंडारा येथे वाघाच्या मिश्यांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. अधिकारी यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी सापळा रचून तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना ताब्यात घेतले. यात अश्फाक शेख, प्रकाश मत्ते, रवींद्र बारई यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून वाघाच्या १७ मिश्या जप्त करण्यात आल्या. आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमांद्वारे वनगुन्हा नोंदवण्यात आला.भंडारा वनविभागाअंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रात हा सापळा रचण्यात आला. ही कारवाई प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उपवनसंरक्षक भारत सिंह हाडा, उपवनसंरक्षक राहूल गवई यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वनाधिकारी पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, तसेच वनखात्याचे अधिकारी व कम्रचारी प्रमोद वाडे, य.द. ताडाम, निलेश तवले, गणेश जाधव, दिनेश पडवळ, विनोद शेंडे, सुधीर कुलरकर, संदीप धुर्वे, साकेत शेंडे यांनी केली.