मुंबई-ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
हरी रामचंद्र नरके यांची लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी बहुआयामी ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या आणि तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करतो.
प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
दोन पुस्तके प्रसिद्धमहात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तकांचा समावेश आहे.
या संदर्भातील आणखी बातम्या वाचा….
नरके यांचे निधन:ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले, शरद पवारांची श्रद्धांजली; छगन भुजबळ म्हणाले, वैचारिक आधारस्तंभ निखळला

ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनावर मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे. तर त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला असल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. पूर्ण बातमी वाचा….
गंभीर:हार्टऐवजी अस्थमावर उपचार! हरी नरकेंनी ‘लीलावती’च्या डॉक्टरांवर व्यक्त केली होती शंका; दोषींवर कारवाई करा -सोनवणी

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे बुधवारी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकारावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हरी नरके यांनी गत जून महिन्यात आपल्या एका मित्राशी व्हॉट्सॲप संवाद साधला होता. त्यात त्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या तब्येतीकडे कसे अक्षम्य दुर्लक्ष केले, हे नमूद केले होते. या घटनेमुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणा उजेडात आला आहे.