गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी “आयुष्मान भव”मोहिमेचा शुभारंभ

0
1

गोरेगांव: – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात दि.17 सप्टेबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत संपुर्ण राज्यभर आरोग्य विभागाकडून “आयुष्मान भव” मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ दिनांक 13 सप्टेबरला गोरेगांव तालुका नियंत्रण पथक कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.विनोद चौव्हाण,डॉ.पटले,तालुका नियत्रंण पथकातील सर्व कर्मचारी,तालुक्यातील सर्व आशा सेविका उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत यांनी सांगितले की,आतासर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे.
आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी‌ “आयुष्मान भव” ही महत्त्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
तसेच तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.विनोद चौव्हाण म्हणाले की, ही मोहीम राबवतांना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिमा राबविण्यात येतील.राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे.