Home Uncategorized मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

0

नागपूर,  दि.30 – शहरातील पूर परिस्थितीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज पूरग्रस्त भागाला भेट देत पूरपीडितांशी संवाद  साधला. पंचनाम्याच्या कामाला गती देत पूरपीडितांना शक्य ती मदत शासनाकडून दिली जाईल, असे त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना आश्वस्त केले.

मंत्री श्री. पाटील यांनी  सकाळी अंबाझरी तलाव, अंबाझरी घाट, काचीपुरा,  सरस्वती विद्यालय, कॅार्पोरेशन कॅालनी तसेच सिताबर्डीतील  पुलाला भेट देत पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी काचीपुरा आणि कॅार्पोरेशन कॅालनीतील पूरपीडितांशी संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले.

  शासन स्तरावरून पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली असून 2 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आतापर्यंत सुमारे 12 हजार 500 पंचनामे पूर्ण झाले आहेत. शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे यावेळी त्यांनी पूरपीडितांना आश्वस्त केले.

पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत, भविष्यात करण्यात येणाऱ्या उपायोजना, शासन स्तरावरून सुरू असलेली पंचनाम्याची कार्यवाही, नाग नदीचे खोलीकरण याविषयीची माहिती त्यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी,  जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्याकडून जाणून घेतली. तसेच पंचनाम्याच्या कार्यवाहीला तसेच मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले. यावेळी सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल केंद्रास भेट

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर केंद्रास भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या विविध साधनांच्या प्रदर्शनीची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. संकटकाळात वापरण्यात येणाऱ्या आर. आर. स्वा, इन्स्पेक्शन होल मेकर, व्ही. एल. सी कॅमेरा, सर्कुलर स्वा, ऑक्सिजन सिलेंडर, एअर लिफ्टींग बॅग, फ्लोटिंग पंप, स्कुबा सेट, आस्का लाईट आदी बचाव उपकरणांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक समादेशक कृष्णा सोनटक्के आदी उपस्थित होते.

Exit mobile version