Home Uncategorized भंडारा-गोंदिया मतदारसंघात बसपाने दुसऱ्यांदा दिला तेली समाजाचा उमेदवार !

भंडारा-गोंदिया मतदारसंघात बसपाने दुसऱ्यांदा दिला तेली समाजाचा उमेदवार !

0

गेल्या 4 लोकसभा निवडणुकांत बसपने 50 हजाराच्यावरच घेतले मतदान

खेमेंद्र कटरे/गोंदिया- पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या उमेदवारांतच लढत होणार असल्याचे चित्र जरी असले तरी बसपाने तेली समाजाच्या भाजप नेत्याला उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे चित्र नाकारता येत नाही.कारण भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप काँग्रेस राष्ट्रवादीने आजपर्यंत लोकसभेची उमेदवारी (पोवार-कुणबी वगळता) इतरांना दिलेली नाही.तर बहुजन समाज पक्षाने मात्र दुसऱ्यांदा या मतदारसंघात तेली समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे.या समाजाची मते लक्षणीय(जवळपास 2.50-3 लाख) आहेत.ती मते कितपत बसपकडे वळविण्यात उमेदवार यशस्वी होते,आणि हत्तीची चाल कोणत्या दिशेने राहते, यावर या निवडणुकीतील विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या मताधिकाच्या निकाल अवलंबून राहणार आहे.

2019 च्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपने मोदी लाटेत सहज विजय मिळवला.तीच परिस्थितीही सध्याच्या घडीला दिसून येत असली तरी भारतीय जनता पक्षाच्या महामंंत्री असलेल्या व्यक्तीला उमेदवारी बसपाच्या वतीने मिळाल्याने निवडणुकीत िव्ट्स्ट आला आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत लोकसभेच्या झालेल्या निवडणुका जातीय समीकरणातच झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये जातीय समीकरण आणि तिसऱ्या सक्षम उमेदवाराची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आहे.बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा आढावा घेतल्यास 2004 पासूनच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत 50 हजाराच्यावर मते घेतली आहेत.2004 च्या लोकसभा निवडणुकीत तर बसपने लोधी समाजाचे अजाबराव शास्त्री यांना उमेदवार केले,त्यांनी तब्बल 90 हजार मते घेतल्याने प्रफुल पटेलांना भाजपच्या शिशुपाल पटलेकडून पराभव पत्करावा लागला होता.त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कलार समाजाचे विरेेंद्रकुमार जायस्वाल यांना उमेदवारी दिली,त्यांनी 68246 मते घेतली होती.2014 मध्ये बसपने तेली समाजाचे उमेदवार संजय नासरे यांनाा उमेदवारी दिली,त्यांनी 50958 मते घेतली.तर 2019 च्या निवडणुकीत(सासर माळी/माहेर कुणबी) डाॅ.विजया राजेश नंंदुरकर यांनी उमेदवारी दिली,त्यांनी 52659 मते मिळवली होती.या चारही लोकसभा निवडणुकीत बसपच्या उमेदवाराला मिळालेली मते हि 50 हजाराच्यावरील असल्याने बसपचा मतदाराचा आकडा हा ठराविक आकड्यापर्यंत पोचत असल्याचे स्पष्ट होते.आता परत दुसऱ्यांदा तेली समाजाला बसपने उमेदवारीत प्राधान्य दिले आहे.बसप उमेदवाराला मिळालेल्या त्या मताव्यतिरिक्त आपल्या स्वबळावर अधिक मत घेणारा उमेदवार अजाबराव शास्त्रीसारखा मिळाला तर 1 लाखापर्यंत मत घेण्याची क्षमता बसपमध्ये आहे,हे नाकारता येत आहे.

भाजपने (BJP) विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा संधी दिली, तर काँग्रेसने नवा गडी, नवा डाव हे सूत्र लावत डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीने संजय कुंभलकर यांना उमेदवारी देत निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात बसप हा नवीन चेहऱ्यांना संधी देणारा पक्ष म्हणून ओळखला जात आहे,बसपने आपला उमेदवार परत कधीच रिंगणात उतरवलेला नाही.

31 मार्चपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. यात मतदारांच्या मनात घर करून त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यात कोण यशस्वी ठरतो, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये लढत होणार असली तरी बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर यांच्या उमेदवारीनंतर या लढतीत चुरस वाढण्याची शक्यता आहे. यात जातीय समीकरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली समाजाची सर्वाधिक मते आहेत. या तिन्ही समाजांच्या मतांच्या समीकरणावरच विजयाचे बरेच समीकरण अवलंबून असले तरी कुणबी समाज हा उमेदवार बघून मतदानाचा निर्णय घेणारा समाज आहे.तर पोवार समाज मात्र हा सर्वाधिक 85 टक्के भाजपसोबत असल्याने तो मतदानाच्यावेळी तो समाजापेक्षा पक्षाशीच बांधिल असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे.त्यात दुसऱ्यांदा तेली समाजाचा उमेदवार हा राष्ट्रीय पार्टीकडून रिंगणात असल्याने  काय समीकरण तयार होतात,हे बघावे लागणार आहे.

Exit mobile version