क्लास वन अधिकाऱ्याचा नक्षलग्रस्त भागात सायकलने आणि नावेतून प्रवास

0
8

गडचिरोली : गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाण्यासाठी चांगले रस्ते आणि पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल भाग असल्यामुळे क्वचितच कोणी अधिकारी या भागातील समस्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतो. पण दक्षिण गडचिरोलीचे अपर जिल्हाधिकारी म्हणून दोन महिन्यापूर्वी रुजू झालेल्या विजय भाकरे यांनी भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशिल भागात कोणतीही पोलिस सुरक्षा न घेता चक्क छोट्या नावेतून आणि सायकलने प्रवास केला.

भामरागडचे तहसीलदार प्रकाश पुप्पलवार आणि गटविकास अधिकारी स्वप्निल मदगूम यांना सोबत घेऊन त्यांनी अतिदुर्गम भागातील नागरिकांसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मनातील भिती दूर करून त्यांनी समस्याप्रधान भागातील नागरिकांसोबत संवाद वाढवावा, यासाठी आपण या पद्धतीने त्या भागात जाऊन आल्याचे भाकरे यांनी सांगितले.

यावेळी सदर अधिकाऱ्यांनी झागेगुडा, गोल्लागुडा भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडीलाही भेट दिली. छोट्या मुलांसोबत खाली बसून खिचडीचाही आस्वाद घेतला. त्यांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराची माहिती त्यांनी घेतली. यावेळी अनेक ग्रामस्थांसोबतही विजय भाकरे यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे त्यांचा हा दौरा चर्चेचा विषय झाला आहे.