डाएट कर्मचा-यांचे पाच महिन्यांचे वेतन रखडले- काळफिती लावून नोंदविला निषेध

0
404

गोंदिया,दि.24:- शालेय शिक्षण व क्रिडा विभागाअंतर्गत असलेल्या राज्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या डाएट सुमारे ८५० अधिकारी व कर्मचा-यांचे पाच महिन्यांपासुनचे वेतन रखडल्याने हे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्यशासनाने त्वरीत वेतन अदा न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा डाएटच्या कर्मचारी संघटनेने दिला आहे. राज्यशासनाच्या या कृतिबद्यल गुरूवारी डाएट येथील प्राचार्यासह सर्व कर्मचा-यांनी काळीफिती लावुन काम करीत याचा निषेध नोंदविला. शासनाने त्वरीत वेतन अदा न केल्यास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने शैक्षणिक कामकाजावर सामूहिक बहिष्कार घालुन राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गोंदिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाचे प्राचार्य राजेश रूद्रकार, प्रदीप नाकतोडे, नरेश वैद्य, भाउराव राठोड, योगेश्वरी नाडे, लिपीक अशोक गभने यांनी दिला आहे. जिल्ह्यातील डाएटच्या कर्मचा-यांना मे महिन्यापासुन वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच महिन्यापासुन वेतन रखडल्याने डाएट कर्मचा-यांचे गृहकर्ज, वाहनकर्जाचे हप्ते थकले असुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय खर्चाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाच महिन्याचा वेतनासह मार्च महिन्याचे कपात केलेले २५ ते ५० टक्के वेतनही मिळाले नसल्याने डाएट कर्मचा-यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.