होम आयसोलेशन रुग्णांना अचूक वैद्यकीय सल्ला मिळण्यासाठी पुढाकार घ्या : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

0
74

नागपूर दि.7 : नागपूर शहरातील गेल्या महिनाभरापूर्वीच्या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने एकजुटीने समाधानकारक नियंत्रण आणले आहे. खाटांची, औषधांची व ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता आहे. तथापि, मृत्यू दर कमी करण्यासोबतच गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) असणाऱ्या रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा, अशी यंत्रणा बळकट करण्याचे निर्देश, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.

डॉ. नितीन राऊत यांनी पालक सचिव असीम गुप्ता यांच्यासह मुंबई येथून आज कोरोना संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, यांच्यासह महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी झाले होते.

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी गेल्या महिन्याभरात खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनच्या नियमित पुरवठ्याची यंत्रणा, औषधांची मुबलक उपलब्धता जिल्ह्यात असून आता डॉक्टरांची काही प्रमाणात कमतरता जाणवत असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय गेल्या महिन्याभरात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबतची माहिती दिली.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणेमध्ये करण्यात आलेली सुधारणा, सामान्य नागरिक व त्यांच्यासाठी करण्यात आलेल्या नव्या उपाययोजना, ग्रामीण भागात वाढविण्यात आलेल्या चाचण्या, माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेसाठी जिल्हाभरात सुरू असलेले उपक्रम, आशा अंगणवाडी सेविका व अन्य क्षेत्रातून या उपक्रमासाठी होत असलेली मदत याबाबतची माहिती दिली.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शहरातील खाजगी हॉस्पिटलचा वाढलेला सहभाग, लोकांच्या घरापर्यंत जाऊन चाचणी करण्याचा सुरु करण्यात आलेला उपक्रम, वाढविण्यात आलेल्या चाचणीची संख्या, डॅशबोर्डवर माहितीची उपलब्धता तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी २४ तास सुरू करण्यात आलेल्या वॉररूमची माहिती दिली.

पालक सचिव असीम गुप्ता यांनी सामान्य नागरिकांना बेडच्या उपलब्धतेबाबत व चाचणी केंद्रांच्या या संदर्भातील माहिती घरबसल्या मिळावी, यासाठी ॲप विकसित करण्याची सूचना केली. नागपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता घरामध्ये वैद्यकीय उपचार करण्याच्या तयारीत आहे. त्यांना योग्य ती वैद्यकीय माहिती, घरापर्यंत चाचणीची सोय, शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गेल्या महिन्याभरात परिश्रमपूर्वक सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या  कामाची नोंद प्रशासनाने घेतली असल्याचे सांगितले. चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात यावी, नागरिकांनी चाचण्यांना भयमुक्त वातावरणात प्रतिसाद द्यावा यासाठी प्रचार प्रसिद्धी मोहीम राबविण्यात यावी, खासगी चाचणी केंद्रातून गेलेल्या अहवालाची नोंद महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडे योग्य प्रमाणात व्हावी. घराघरातील रुग्णांबाबतची माहिती मिळावी. खाटांची, ऑक्सिजनची व औषधांची उपलब्धता याबाबतची माहिती सामान्य नागरिकांना देखील मिळावी, खासगी हॉस्पिटलकडून लूट होणार नाही यावर नियंत्रण मिळावे, महानगर पालिकेच्या वॉररूममधून (0712-2567021) सर्व प्रकारची माहिती मिळावी, पोलिस विभागाने मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, गर्दी व्यवस्थापन यासाठी सार्वजनिक ठिकाणी आणखी कडक धोरण अवलंबावे, गरज नसताना नागरिक बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी केल्या.