वाशिम, दि. २० : शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार लग्न समारंभात सोशल डिस्टसिंग जास्तीत जास्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी आहे. या समारंभात बँड पथकांनाही बँड वाजविण्याची परवानगी देण्यात येत असून त्यांचा समावेश ही उपस्थित असलेल्या ५० व्यक्तींमध्ये राहील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.
बँड वाजविताना एकाच ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टसिंग राखणे बंधनकारक राहील. दुर्गादेवी, नवरात्र महोत्सवात देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली असल्याने याप्रसंगी बँड वाजवण्यावर बंदी राहील. बँड पथकाच्या मालकांनी पथकातील सर्व सदस्यांची नियमित थर्मल स्कॅनिंग करून नोंद करणे बंधनकारक राहील, तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये, या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घ्यावी. बँडकरिता आवश्यक असणारे सर्व साहित्य नियमित निर्जंतुकीकरण करून वापरणे बंधनकारक राहील.
कोविड -१९ अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी निर्गमित शासन परिपत्रक, सूचनापत्र, आदेश व निर्णय तसेच जिल्हाधिकारी कार्यालायाकाडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे कार्यक्रम आयोजित करतांना काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (१८६० चे ४५) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.