गोंदिया,दि.21–‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत गोंदिया जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करून कोविड-१९ संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिक्षक जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात विविध उपक्रम राबविले जात आहे. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी जास्तीत जास्त प्रमाणात समन्वय साधता येईल, या उद्देशाने पोलिस अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत. त्यातच कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम राज्यात राबविली जात आहे. जिल्ह्यात मोहिमेचा पहिला टप्पा आटोपला असून दुसर्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या अनुषंगाने सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह अंतर्गत मौजा टेकरी, बाळापूर, पालांदूर, गरारटोला, माताटोली येथील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात नागरिकांची तपासणी करून मोफत औषधी वितरण करण्यात आले. नागरिकांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाबद्दल मार्गदर्शन व जनजागृती व्हावी, यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी व आरोग्य चमुने मार्गदर्शन केले. या शिबिरांमध्ये ग्रामीण रूग्णालय देवरी अंतर्गत आरोग्य मोबाईल युनिटचे डॉ.रहांगडाले व त्यांच्या चमुने नागरिकांची बीपी, शुगर, ताप व इतर आजारांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोहचे प्रभारी पोउपनि शिंदे, पारखे, गिरी व पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी सहकार्य केले.