अस्वलाच्या हल्यात अंजोरा येथील युवक जखमी

0
384

आमगाव,दि.22: तालुक्यातील  अंजोरा येथे सकाळच्या सुमारास जंगलपरिसरातील रस्ताने दौड लावत असलेल्या एका युवकावर अस्वलाने हल्ला केल्याने युवक जखमी झाल्याची घटना आज(दि.22)सकाळच्या सुमारास घडली.जखमी युवकाचे नाव अंकुश नरेंद्र नेवारे(वय 22) असे आहे.

सविस्तर असे की,अंजोरा येथील काही युवक पोलिस भरतीची पूर्वतयारी म्हणून सकाळी 6.00 च्या सुमारास अंजोरा-वडद मार्गावर दरदविशी धावण्याकरीता जातात. दरम्यान जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या अस्वलाने अंकुशवर मागून अचानक हल्ला चढविला. अंकुशचे मित्र त्याच्या मागे काही अंतरावर होते. अंकुश हा एकटाच असल्यामुळे अस्वलाने त्याला जमिनीवर पाडून ओरबाळण्यास सुरवात केली.परंतु तेवढ्याच ताकदीने अंकुश ने प्रतिकार करत अस्वलाच्या छातीवर पाय मारल्याने अस्वल बाजूला पडले.क्षणाचाही विलंब न करता अंकुश प्रसंगावधान राखून झाडावर चढला. अस्वलासोबत त्याचे 2 पिल्ले पण होते. त्वरित अंकुशने झालेल्या घटनेची माहिती त्याच्या मागे असलेल्या मित्रांना दिली. तोपर्यंत अस्वल पिल्लांना घेऊन जंगलात निघून गेले होते. कदाचित पिल्लांच्या असुरक्षिततेमुळे त्याने हल्ला केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

झालेल्या घटनेची माहिती तात्काळ वनमजुर बाबूलाल तुरकर यांना देण्यात आली, त्यांनी अंकुशला प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, आमगाव येथे दाखल करून  माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांना दिली.