लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह

0
222

गोंदिया,दि.27 : सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित्ताने 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 27 ऑक्टोबर रोजी गोंदिया येथे भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेवून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. जनजागृती सप्ताहानिमीत्त गोंदिया शहरातील विविध शासकीय कार्यालये, मुख्य चौकात (जयस्तंभ चौक, फुलचूर नाका) कापडी फलक, भित्तीपत्रके लावून पत्रके वाटण्यात आली. सोशल मिडीया जसे व्हॉट्सॲप संदेश, ऑडिओ व्हिडिओ क्लीप, बल्क एसएमएसच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संपर्क करण्यात आला.

गोंदिया तालुक्यातील शासकीय कार्यालये व मुख्य गाव कारंजा, फुलचूर, सटवा, डव्वा, कवलेवाडा, रावणवाडी, कामठा तसेच तिरोडा तालुक्यातील शासकीय कार्यालये व मुख्य गाव एकोडी, दांडेगाव, विर्शी, वडेगाव, मुंडीकोटा, कवलेवाडा या ठिकाणी ग्रामभेट देवून वर्दळीच्या ठिकाणी स्टिकर्स, पोस्टर्स लावून नागरिकांना पत्रके वाटून भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात आली.

या जनजागृती सप्ताहनिमीत्त रिक्षा संघटनाच्या माध्यमातून जयस्तंभ चौक व बसस्थानक गोंदिया येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती व संपर्क क्रमांकाचे स्टिकर्स रिक्षा वाहनावर लावून भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत जनजागृती करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सामान्य नागरिकांची भ्रष्टाचाराविरुध्द तक्रार असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे येऊन भ्रष्टाचाराचे समुळ उच्चाटन करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागास सहकार्य करावे.

00000