‘आत्मा’च्या सेंद्रिय भाजीपाला व धान्य विक्री केंद्राला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांची भेट

0
107

वाशिम, दि. 30 : सेंद्रिय, जैविक पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, धान्य, रानभाज्या इत्यादी उत्पादने थेट शेतकरी ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आत्मा’ कार्यालय परिसरात सुरु करण्यात आलेल्या सेंद्रिय भाजीपाला व धान्य विक्री केंद्राला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २९ ऑक्टोबर रोजी भेट दिली. तसेच याठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या, रानभाज्या, धान्य याविषयी माहिती घेतली. याठिकाणी आदिवासी महिला बचत गटामार्फत चालविण्यात येत असलेल्या उपहार केंद्रालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रिय शेतकरी गटांनी जिल्ह्यामध्ये सेंद्रिय पध्दतीने पिकविलेला भाजीपाला, फळभाज्या, डाळी, धान्य व रानभाज्या वाशिम शहरातील नागरीकांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘आत्मा’ कार्यालय येथे विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी याठिकाणी भाजीपाला व धान्य विक्रीसाठी उपलब्ध असते, अशी माहिती श्री. तोटावार यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय व जैविक उत्पादनांना ग्राहक उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने विशेष प्रयत्न करावेत. विशेषतः या उत्पादनांची प्रतवारी करून त्याचे पॅकेजिंग व मार्केटिंगसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. विक्री केंद्रावर उपलब्ध असलेला भाजीपाला, धान्य, सेंद्रिय उत्पादने याविषयी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.