जिल्हा न्यायालय येथे महिला सक्षमीकरण कायदेविषयक जनजागृती

0
66

वाशिम, दि. ०६ : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे महिला सक्षमीकरण कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी न्यायाधीश सौ. यु. टी. मुसळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष अॅड. छाया मवाळ, उपाध्यक्ष अॅड. एस. बी. शेवलकर, सचिव अॅड. एन. टी. जुमडे, सहसचिव अॅड. व्ही. जे. सानप, कोषाध्यक्ष अॅड. एस. एन. सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्यायाधीश सौ. मुसळे यांनी यावेळी गर्भलिंग चिकित्सा कायदा व त्याचे महत्व विशद केले. जिल्हा वकील संचाच्या अध्यक्ष अॅड. सौ. मवाळ यांनी महिलांनी कायद्याचे ज्ञान घेवून स्वतःचे सर्व अत्याचारापासून संरक्षण केले पाहिजे, असे सांगितले. अॅड. प्रतिभा वैरागडे व अॅड. उषा भगत यांनी घरगुती हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायदा, भारतीय दंड संहिता आदी कायद्यांची विस्तृत माहिती दिली. महिलांना सर्व कायदेशीर तरतुदीविषयक पुस्तिकेचे यावेळी वितरण करण्यात आले.

यावेळी सखी वन स्टॉप सेंटरबाबत केंद्रीय समन्वयक प्रतिक्षा भगत यांनी माहिती दिली. तसेच पॅरामेडिकल सिस्टर स्वाती भवर, समुपदेशक वैशाली सोनवणे, केस वर्कर संतोष गोडघासे, प्रज्ञा इंगळे, लक्ष्मी मनवर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विधी सेवा सल्लागार अॅड. दिपाली सांबर यांनी केले, आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. देशपांडे यांनी मानले.