अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिवाळीत केली स्वीटमार्ट व हॉटेल्सची तपासणी

0
122

बुलढाणा, दि. 15:- सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून बाजारामध्ये मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहेत. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळतो का याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी स्वत: नुकतीच केली आहे.

बुलढाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, कारंजा चौक, बाजार गल्ली येथील 12 ते 15 खाद्य पदार्थाचे स्टॉल व स्वीट मार्टची यावेळी तपासणी केली. यामध्ये खाद्यपदार्थावर निर्माण तारीख, खाण्यास योग्य असल्याची अंतिम तारीख, परवाना, खाद्य पदार्थ झाकून ठेवले आहे किंवा नाही, पदार्थ बनविणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही, ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात त्याठिकाणी स्वच्छता आहे की नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.शिंगणे यांनी केली.ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. एन दिवाळीच्या दिवशी स्वतः मंत्र्यांनी सुरू केलेल्या या धडक कारवाई मुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये जरब बसणार आहे.

तपासणीसाठी २३ नमुने ताब्यात घेतले
वाशिम, दि. १५  : दीपावली दरम्यान मिठाईसह अन्न खाद्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने ज्यादा नफा कमाविण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सा. द. तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अचानक जावून दुकानांची तपासणी केली जाते. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी नि. रा. ताथोड व य. दि. कोकडवार यांच्या पथकाने जिल्ह्यातील तपासणी दरम्यान १६ आस्थापनांमधील खाद्यतेल, तूप, मिठाई व इतर खाद्य पदार्थ असे एकूण २३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असल्यास अथवा इतर काही तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, आकाशवाणी रोड, सिव्हील लाईन, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.