भंडारा: तालुक्यात पूरपरिस्थिती नंतर बाधितांना दिली गेलेली मदत व धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यासोबतच अन्य विषयांना घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी लाखांदूर तहसीलदारांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी तहसीलदारांना काही निर्देशही दिले.
लाखांदूर येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत खासदार सुनील मेंढे यांनी पूरपरिस्थिती दरम्यान बाधित झालेल्या कुटुंबांना देण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेतला. ज्या लोकांना अजून पर्यंत मदत मिळाली नाही किंवा देण्या शिल्लक आहे अशा सर्वांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशा सूचना खासदारांनी केल्या. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भरपाई संदर्भात यावेळी खासदारांनी आढावा घेतला. अशा शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची मदत दिल्याचे तहसीलदारांनी यावेळी सांगितले.
धान खरेदी केंद्रावर धान विकण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सात-बारावर वनहक्क, सरकार किंवा वनपट्टे अशी नोंद इतर अधिकार या शिर्षकाखाली असेल तर अशांचे धान खरेदी केले जात नव्हते. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीनंतर खासदारांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तहसीलदारांनी एक पत्र जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना पाठवून त्याआधारे ही खरेदी करावी असे निर्देश खासदारांनी दिले. या कारणासाठी कुठल्याही शेतकऱ्याला धान विक्री पासून वंचित ठेवू नये अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. सोबतच ज्या संस्थांना धान खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे मात्र अजूनही केंद्र सुरु केलेली नाहीत अशा संस्थांनी तात्काळ केंद्र सुरू करण्याच्या सूचनाही खासदारांनी केल्या.
तालुक्यातील अन्य विषयांवरही यावेळी चर्चा केली गेली. सुरु होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीला भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, पंचायतीचे उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, हरीश वाघमारे वन्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.