
वाशिम, दि. ०8 : जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना व्हावी, आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, या उद्देशाने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२०-२१ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने तयार केलेल्या ‘सन्मार्ग’ या पॉम्प्लेट्चे विमोचन ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
‘सन्मार्ग’ या पॉम्प्लेटमध्ये आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, कन्यादान योजना, अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे व दुभत्या जनावरांचे गट वाटप आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे. लाभाचे स्वरूप, अटी व शर्ती ,आवश्यक कागदपत्रे तसेच कोणत्या अधिकाऱ्यांशी योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा, हे नमूद करण्यात आले आहे. पॉम्प्लेट्मधील योजनांच्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.