सनफ्लॅग कंपनीच्या संपाचा विषय केंद्रीय मंत्र्यांच्या दालनात

0
37

भंडारा- वरठी येथील सनफ्लॅग स्टील कंपनीच्या गैरव्यवस्थापनाची केंद्र सरकारने तातडीने चौकशी करावी आणि मनमानी पद्धतीने काम करणार्‍या व्यवस्थापनाच्या मुसक्या आवळाव्या, अशी लेखी मागणी खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांची भेट घेऊन केली. १३ मार्चपासून कंपनी मधील कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून खासदार सुनील मेंढे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांना पाठिंबा दर्शवला आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठय़ा संख्येने रोजगार निर्मिती करणार्‍या सनफ्लॅग कंपनीने मागील दोन वर्षात सर्वाधिक उत्पादन केले आहे. कोरोना संकटाची पार्श्‍वभूमी असून सुद्धा सुमारे २000 कामगार अहोरात्र काम करीत होते. कंपनी उत्तम स्थितीत सुरु असताना देखील कोरोनाचे कारण देऊन ९00 कामगारांना कामावरुन अचानक कमी करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासंबंधी योग्य उपाययोजना नसल्याने नजीकच्या ग्रामपंचायतने व असंख्य नागरिकांनी कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु यासंबंधी कुठलीही कार्यवाही कंपनीने केली नाही. कंपनीमधील अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कामगारांना अपघातांना सामोरे जावे लागते व अपंगत्व येते. कामगारांचे मृत्यू सुद्धा झाले आहे. २0१७ पासून करारबद्ध असलेली वेतनवाढ बेकायदेशीररित्या रोखून ठेवणे यामुळे कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापनाची सखोल चौकशी होणे कामगारांच्या व विभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी या मागणीत नमूद केले आहे.