
गोंदिया,दि.30 : नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे किंवा अन्यप्रकारे निवासी, वाणिज्यिक/औद्योगिक प्रयोजनासाठी भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी फ्री-होल्ड (भोगवटदार वर्ग-1) करण्यास महसूल व वन विभागाचे 2 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.
गोंदिया उपविभागात एकूण 2495 भाडेपट्टे असून सदर प्रकरणात कालबध्द कार्यक्रम आखुन वरील नमूद शासन निर्णयानुसार तात्काळ नझुल जमिनी फ्री-होल्ड (भोगवटदार वर्ग-1) करण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
यासाठी नझुल जमिनी फ्री-होल्ड (भोगवटदार वर्ग-1) करण्यासाठी पुढीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. दिनांक 1 जुलै ते 8 जुलै 2021 पर्यंत नझुल जमिनी फ्री-होल्ड (भोगवटदार वर्ग-1) करण्यासाठी नागरिकांकडून अर्ज स्विकारणे. 9 जुलै ते 23 जुलै 2021 पर्यंत अर्जाच्या अनुषंगाने संबंधीत विभागाचे अहवाल मागविणे. 24 जुलै ते 6 ऑगस्ट 2021 पर्यंत संबंधीत विभागाचे प्राप्त अहवालानुसार उपविभागीय अधिकारी गोंदिया यांनी अहवाल तयार करुन प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे. असा कालबध्द कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. असे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000