नागरिकांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाचे संकल्प घ्यावे – जिल्हाधिकारी खवले

0
37

**आजपासून हत्तीरोग निर्मूलन मोहीम*

गोंदिया,दि.30 : हत्तीरोग निर्मूलन मोहीम 1 जुलैपासून जिल्ह्यात सुरु होत असून आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.

1 जुलै ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्यात सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरापर्यंत येणार असून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टीने गरोदर माता, अती गंभीर आजारी रुग्ण व दोन वर्षाखालील बालके वगळता पात्र नागरिकांनी वयोगटानुसार डी.ई.सी. व अलबेंडाझोलच्या गोळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष सेवन करावे.

आरोग्य विभागातर्फे 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या सामुदायिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे.

हत्तीरोगाचे समुळ उच्चाटन करण्याकरीता हत्तीरोग निर्मूलन मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून हत्तीरोगावर आळा घालण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले आहे.
00000