
विनोद सुरसावंत/ककोडी,दि.07ः– देवरी तालुक्यातील ककोडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था म. ककोडी र. न. १३२३ हि सोसायटी कार्यरत आहे. ह्या सोसायटीवर ककोडी तसेच ककोडी परिसरातील चिल्हाटी,मुरमाडी, उचेपुर, कुणबिटोला, कथलीटोला, तुमडीकसा, जपकसा, लेडिंजोब , चिपोटा, महाका ह्या गावातील शेकडो शेतकरी सभासद असून दरवर्षी शेतीकरीता पिक कर्ज घेवून आपले शेतीचे कामे करतात.परंतु यावर्षी आजपर्यंत एकाही शेतकर्याला पीककर्ज मंजूर केलेले नाही. त्यामुळे शेतकर्यांना शेतीची कामे करतांना आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
सोसायटीच्या सबंधित शेतकर्यांनी आपले नियमित पीककर्ज मार्च महिन्यात संस्थेकडे जमा केलेले असूनही एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडयात पिक कर्जासाठी लागणारे सर्व कागद पत्र सोसायटीच्या कार्यालयात जमा केले. आज तीन महिने लोटुनही त्यांना पिक कर्ज मिळाले नाही. ककोडी सोसायटी सोडुन जवळच्या सर्व सोसायट्याचे पिक कर्ज वाटप झाले आहे. जवळच्या चिचगड़ सोसायटीने २०० शेतकर्यांना ९८ लक्ष रुपयांची पीककर्ज वाटप केले आहे. फक्त ककोडीच एक सोसायटी आहे जिथे एकहि शेतकर्यांना पीककर्ज वाटप झालेला नाही.सोसायटीचा सचिव कधीही कार्यालयात हजर राहत नाही. तसेच सोसायटीचे अध्यक्ष आणि सो० संचालक समितीचे पद अधिकारी सदस्य जे प्रतिनिधी म्हणून निवडून सोसायटीवर जातात त्यांचा काहीही ठाव ठिकाणा राहत नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या समस्याचां निराकारण होत नाही.सोसायटीवर पाठविलेले प्रतिनिधी कुंभकर्णी निंद्रेमध्ये झोपले असुन त्यांच्यावरही कारवाईची मागणी होऊ लागली आहे.
सोमवारला काही शेतकरीवर्ग सोसायटीच्या कार्यालयावर गेले असता कार्यालय बंद होते. त्यामुळे ना सचिव ना प्रतिनिधी कोणीही त्यांना भेटले नाही. सोसायटी सचिव आणि संचालक समितीवर प्रसाशनाने कारवाई करुन शेतकर्यांना योग्य न्याय दयावा अशी मागणी सदस्यांनी केली आहे.