६० वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणात अमरावती विभागात वाशिम जिल्हा अग्रेसर

0
17

वाशिम, दि. ०७- : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ८८ हजार ७८६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या टक्केवारीचा विचार करता वाशिम जिल्हा अमरावती विभागात अग्रेसर आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या सुमारे १ लक्ष ८९ हजार ५३२ इतकी आहे. यापैकी ८८ हजार ७८६ व्यक्तींचे म्हणजेच ४७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यातील ६० वर्षांवरील व्यक्तींचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी सध्या विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्याचा खरीप हंगाम लक्षात घेवून शेतकरी व शेतमजुरांना लस घेणे सोयीचे व्हावे, यासाठी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. तसेच ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना ऑनलाईन नाव नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर येवून लस घेता येते.

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘कोविन’ अॅपवर रोज रात्री ९ वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या सोयीसाठी सद्यस्थिती वाशिम येथील सामान्य रुग्णालयामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी लस उपयोगी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर

कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या काही दिवसांत येवू शकते, अशी शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. या लाटेपासून स्वतःचा व कुटुंबियांचा बचाव करण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. कोरोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी कोरोना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेवून २८ दिवस झालेल्या, तसेच कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेवून ८४ दिवस झालेल्या व्यक्तींनी नजीकच्या लसीकरण केंद्रांवर सदर लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.