गडचिरोली,दि.25:-नगरपरिषद अंतर्गत कंत्राटदारामार्फत कामावरून काढून टाकलेल्या जुन्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या प्रमुख मागणीसह कामगारांच्या न्याय मागण्यासाठी प्रहारचे आरमोरी तालुका अध्यक्ष निखिल धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त कामगारांनी २४ आगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली.त्या आंदोलनाची दखल घेत गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी यांनी सात दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने प्रहारने सफाई कामगारासाठी सुरु केलेले उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
कामगार राज्यमंत्री व कामगार आयुक्त यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, कामगार राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्या आढावा बैठकीत आम्ही कामगारांना कामावर घेण्यास तयार आहोत असे कबूल करूनही व कामगार आयुक्तांनी कामगारांना कामावर घेण्याचे आदेश दिल्यानंतरही त्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्यावर व आदेशाची पायमल्ली करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात यावी.अन्यायग्रस्त कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देऊन कंत्राटदार यांच्या चुकीने चार महिने कामावरून खाली राहावे लागल्याने नुकसान भरपाई कंत्राटदार व मुख्याधिकारी यांच्याकडून वसूल करून देण्यात यावी. शासकीय वाहने नगरपरिषदच्या मालकी हक्काच्या जागेत ठेवण्यात यावे,बोगस परवाना दाखवून कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्यात यावे,कामगारांना सर्व शासकीय सोयीसुविधा मंजूर असताना ते न मिळाल्यामुळे ते मंजूर करण्यात यावे,मजुरांचा इपीएफ दर महिन्याला भरून त्याची मजुरांना रीतसर पावती देण्यात यावी,आदी विविध मागण्यांसाठी प्रहारचे वतीने अन्यायग्रस्त कामगारांना घेऊन आमरण उपोषण केले सुरु करण्यात आले होते. सोमवार पर्यंत तोडगा काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने तात्पुरते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत असलेले उपोषण स्थगीत करण्यात आल्याचे प्रहार सेवक निखिल धार्मिक यांनी सांगितले.यावेळी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम,सफाई कामगार सघटन अध्यक्ष अक्षय भोयर,कायाध्यक्ष पुषोतम बदोले,सुभाष रामटेके अविनाश ऊईके, राजेश मुन, सुनिल मेश्राम,भाऊराव दिवटे, सचिन बोदलकर, हरीदास गराडे, रीना बांबोळे, रेखा कांबळे,कुसुम मेश्राम, ताराबाई खोब्रागडे, विजेता खोब्रागडे यासह मोठ्या संख्येने उपोषणकर्ते सफाईकामगार उपस्थित होते.