
गोंदिया : शहरालगतच्या फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतीचा समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही ग्रा.पं.कडून प्रस्ताव सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले होते. मात्र या संदर्भात मार्गदर्शन व सुचनाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी सतत टाळाटाळ होत असल्याने फुलचूर आणि फुलचूरटोला यो दोन्ही गावातील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाल्याने 8 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्यत्याग आंदोलनाला सुरवात करण्यात आले होते.फुलचूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य सीए राजेश चतुर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु होते.दरम्यान भाजप व शिवसेनेच्यावतीनेही आंदोलनाला समर्थन देण्यात आले होते.आंदोलन सुरु असतानाच 13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डाॅ.नयना गुंडे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्ते राजेश चतुर,आमदार विजय रहागंडाले,माजी आमदार केशव मानकर,शिवनारायण नागपूरे,लक्ष्मीबाई निर्वीकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर फुलचूर व फुलचूरटोला नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्वासन दिले.जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर माजी आमदार मानकर यांच्या हस्ते चतुर यांना निंबु पाणी पाजून आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनाला सहकार्य केल्याबद्दल फुलचुर ग्राम पंचायत सरपंच मिलन रामटेक्कर व फुलचुर टोला सरपंच कोमल धोटे यांचे आभार आंदोलकांनी मानले.