
कोरची,दि.१3-–
छत्तीसगढ राज्याच्या सिमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातील कोरची- भिमपूर-बोटेकसा राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी रामसायटोला येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षिका निलोफर काझी यांनी केली आहे.
कोरची- भिमपूर-बोटेकसा राज्य महामार्गावर खड्डे पडल्यामुळे कोरची येथे भिमपूर, सोहले, नांदळी, मर्केकसा, बोटेकसा येथील कर्मचारी, गरोदर माता व रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर रस्ता दुरूस्त करण्यासाठी सरपंच संघटना, महा ग्रामसभा व लोकप्रतिनिधींकडून अनेकदा निवेदने देण्यात आली तर दोन महिन्यापूर्वी भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने चक्काजाम सुध्दा करण्यात आले होते. त्यावेळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तडस यांनी लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सदर अश्वासन हवेतच विरले आहे. या महामार्गावर मागील नऊ वर्षात करोडो रूपये खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पटलावर आहे. मात्र रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जि.प शिक्षिका निलोफर काझी यांनी केली आहे.
कोरची-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर पॅचेस चे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अवघ्या २ दिवसातच रस्त्यावर टाकलेली गिट्टी निघाल्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करुन रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.