तर मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडणार ; शेकापचा इशारा

0
32

गडचिरोली दि.07 मार्च-फुटपाथ धारकांशी चर्चा करून पर्यायी व्यवस्था आणि गाळे वाटपाबाबत सकारात्मक आश्वासन दिले असतांना ते पुर्ण न करताच अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाने फुटपाथ धारकांना व्यवसायापासून वंचित करण्याचे प्रयत्न राजकीय दडपणाखाली येऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी करीत आहेत. हा प्रकार तात्काळ थांबला नाही तर शेतकरी कामगार पक्षातर्फे मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडणार असा इशारा शेकापचे नेते भाई रामदास जराते यांनी दिला आहे.

भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, मागील पंधरा दिवसांपूर्वी नगर परिषद, महामार्ग विभागानी पोलिस विभागाच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली होती. यामुळे हजारो कुटुंबांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शेकापच्या नेतृत्वाखाली फुटपाथ धारकांचे आंदोलन उभे करण्यात आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, वंचित आघाडी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी आंदोलकांशी चर्चा करून ५८५ फुटपाथ धारकांना तात्पुरती पर्यायी जागा आणि कारगिल चौकातील गाळे देण्याबाबत अनुकुलता दर्शविली होती. लांझेडा लगतच्या तलाव परिसरात जागाही नियोजित केली गेली. मात्र डुक्कर बसण्याच्या खड्ड्यांमध्ये दुकान लावणे शक्य नसल्याने फुटपाथ धारक सदर जागा व्यवस्थीत होण्याची वाट बघत होते. असे असतांना सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन न पाळता पुन्हा फुटपाथ धारकांना हटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला व्यवसायापासून वंचित करण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षातर्फे हाणून पाडले जाणार असून वेळ प्रसंगी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा भाई रामदास जराते यांनी दिला आहे.