Home विदर्भ मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी –...

मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी – दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

0

अमरावती दि 10  : दर्यापूर तालुक्यात दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध असून तेथे दूध विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करणे गरजेचे आहे. यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल. दुधाचा व्यवसाय ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्वाचा घटक आहे. दर्यापूर तालुक्यात मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी येथे दिले. विभागीय क्रीडा संकुलातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार बळवंत वानखेडे, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी गजानन तावडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष  सोनवणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.मोहन गोहत्रे, पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे डॉ.व्ही श्रीधर, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प तथा मदर डेअरीचे प्रकल्प प्रमुख मुकेश झा आदी उपस्थित होते.

बैठकीत बोलतांना श्री केदार म्हणाले, अंजनगाव व  दर्यापूर तालुक्यात दूध निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून दूध संकलन केंद्र सुरू करण्यास वाव आहे. जवळपास चाळीस दूध संकलन केंद्र तेथे निर्माण करता येऊ शकणे शक्य आहेत. त्या अनुषंगाने तेथील भागाची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दुधाळ जनावर वाटपाची योजना प्रभावीपणे राबवावी

अनुसूचित जाती व जमातीसाठी अनुदान तत्वावर राबविण्यात येणाऱ्या जनावर वाटपाच्या योजनेत देशी वंशाच्या जातीचा समावेश प्रामुख्याने करण्यात यावा. होस्टेन, जर्सी गायीच्या ऐवजी भारतीय वंशाच्या उच्च उत्पादकता असलेल्या गायी म्हणजे कांकरेज, गीर, साहिवाल, मुऱ्हा या गायींचे वाटप जास्त प्रमाणात करण्यात  यावे. ग्रामीण भागात योजनेच्या माध्यमातून दुधाळ जनावरांच्या  पालनाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. असे निर्देश श्री केदार यांनी दिले.

ग्रामिण भागात शेळीपालन सकारात्मक अर्थचक्रासाठी आवश्यक

ग्रामीण भागातील  शेळीपालनचा जोड व्यवसाय येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेळीचे वाटप करत असताना देशी जातीच्या दमास्कस शेळीपालनापासून होणाऱ्या आर्थिक फायद्याबाबत पशुसंवर्धन विभागाने जोड व्यावसायिकांमध्ये जनजागृती करावी. असे निर्देश श्री केदार यांनी दिले.

क्रीडासंकुल निर्मितीबाबत आढावा

जिल्ह्यात क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा. खेळाडूंसाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची निर्मिती प्राधान्याने करण्यात यावी असे श्री केदार यांनी क्रीडाविषयक बाबींचा आढावा घेतांना सांगितले. अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात क्रीडा संकुल निर्माण करण्याबाबत प्रस्ताव तयार करून ते शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विभागीय क्रीडा संकुलातील व्यवस्थेची माहिती त्यांनी यावेळी घेतली. खेळात प्रविण्यप्राप्त  विद्यार्थ्यांना एक सत्र फी शुल्कात सूट देता येईल असे सांगितले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक विजय संतान, शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अंजली ठाकरे, अमरावती अथलिटिक असोसिएशनचे सचिव प्रा.अतुल पाटील, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण संघटनेचे सहसचिव शिवदत्त ढवळे तसेच विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version