संविधानाच्या संरक्षणासाठी संघटित होणे गरजेचे – पालकमंत्री यशोमती ठाकूर

0
29

अमरावती, दि. १४ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  देशाला न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्ये व आदर्श राज्यघटना दिली. या मूल्यांचे व घटनेचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इर्विन चौकातील स्मारकस्थळी आयोजित सामूहिक अभिवादन सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रारंभी महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी राज्यमंत्री सुनील देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, पुतळा सौंदर्यीकरण समितीचे किशोर बोरकर, ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर, डॉ. श्यामसुंदर निकम, माजी महापौर विलास इंगोले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री  ठाकूर म्हणाल्या की, डॉ. आंबेडकर यांनी ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ असा संदेश समाजाला दिला. तो अंमलात आणला पाहिजे. लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे.

शोषणमुक्त समाजाची निर्मिती हे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. त्याच हेतूने त्यांनी समता, न्याय प्रस्थापित करणारे संविधान लिहिले. या संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे श्री. कोळसे पाटील यांनी सांगितले. श्री. देशमुख, श्री. एडतकर यांचीही भाषणे झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी न्या. कोळसे पाटील यांना जीवन गौरव, श्री. एडतकर यांना जीवन संघर्ष, पालकमंत्री श्रीमती ठाकूर, माजी राज्यमंत्री श्री. देशमुख यांना कर्तव्यपूर्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  श्यामसुंदर निकम, पी. एस. खडसे आदींनाही यावेळी पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले.