अखेर महसूल कर्मचारी संघटनेचा संप स्थगित,मागण्या झाल्या मंजूर

0
84

.शासन निर्णय हाती घेतल्यावरच संप घेतला मागे

गोंदिया,दि.14ः-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती आणि बदल्या विभागांतर्गत करण्याचा तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या आश्‍वासनानंतर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आंदोलन बुधवारी सायंकाळी मागे घेतले आहे.त्यामुळे काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रांत आणि तहसील कार्यालयातील रखडलेली कामे आता सोमवारपासून मार्गी लागणार आहेत.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत घेवून विविध चार टप्यात आंदोलन केले. अखेरच्या टप्यात दि. ४ एप्रिल पासून बेमुदत संप केला. संपूर्ण राज्यांत न भूतो न भविष्यते असे एकूण दहा दिवस बेमुदत संपाचे आंदोलन यशस्वी झाले. याचे संपूर्ण श्रेय संपूर्ण महसूल कर्मचाऱ्यांना आहे.
दि. ७ एप्रिल रोजी  अप्पर मूख्य सचिव यांचे सोबत चर्चा झाली. त्यावेळी काही मूद्यांवर एकमान्यताही झाली. परंतु सर्व काही मुद्दे हे मंत्रालयीन सामान्य प्रशासन विभाग यांच्यावर अवलंबून होते. त्याप्रमाणे कोणत्याही फाईलची सध्यस्थिती स्पष्ट होत नव्हती. त्यामुळे सर्वांच्या मताने आंदोलन तसेच पूढे सूरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
दि.१३ एप्रिल रोजी  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चर्चेसाठी बोलावले. ज्या मागण्यांवर स्पष्ट निर्णय होत नव्हता त्या मागण्यांवर मंत्री थोरात यांनी महसुली कर्मचार्‍यांचे म्हणणे समजून घेतले. आणि शासन निर्णय दिनांक 10 मे 2021 अन्वये करण्यात आलेला नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय वरुन संघटनेच्या निवेदनानुसार विभागीय स्तरावर करण्यात आलेला आहे. तसेच संपूर्ण रिक्त पदे हे माहे जून 2022 पर्यंत भरण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येऊन वित्त विभागात देखील कळविण्यात आलेले आहे. तसेच अनुकंपा संवर्गातील भरती देखील तात्काळ स्वरूपात करण्याबाबत देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच बरोबर जिल्हा स्तरावरील वर्ग 4 ते वर्ग 3 संवर्गातील पदोन्नत्या विहित मुदतीत तसेच पात्र कर्मचाऱ्यांना तात्काळ स्वरूपात देण्याबाबत देखील जिल्हाधिकार्‍यांना कळविण्यात आलेले आहे. याबाबतचे शासन निर्णय तसेच संबंधितांना लेखी पत्र हे दिनांक 13 एप्रिल 2022 च्या चर्चेनुसार रात्री उशिरा कर्मचारी संघटनेकडे देण्यात आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी मंत्रालयातच उपस्थित होते. सदरील शासन निर्णय तसेच लेखी पत्र प्राप्त झाल्यावरच महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे राज्य पदाधिकारी यांनी सदरील संप स्थगित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पुढील सलग चार दिवसांच्या सुटल्यानंतर पुनश्च दिनांक 18 एप्रिल 2022 पासून सर्व महसूल कार्यालय पूर्ववत सुरळीतपणे सुरू राहतील असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष प्र. रामटेके यांनी कळविले आहे.

नायब तहसीलदार संवर्गाच्या पदोन्नती व बदल्या विभागांतर्गत करण्याबाबत आदेश झाले आहेत. यासह इतर मागण्यांबाबतही काही दिवसांमध्ये अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. रिक्त पदांबाबत जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन स्थगित करण्यात आले आहे ‌ राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा हा मोठा विजय आहे.दिपक चव्हाण, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना.