गोंदिया पालिकेने अखेर अतिक्रमणावर चालविला जेसीबी

0
66
गोंदिया- शहरातील गुरुनानक द्वार ते महात्मा गांधी प्रतिमा चौक या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण आज 28 रोजी नगरपालिका प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून जेसीबीच्या माध्यमातून पाडले. तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले. पुढच्या 3 ते 4 दिवसांत ही मोहीम शहरभर राबविण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या बांधकाम अभियंत्या श्रीमती मदान यांनी सांगितले. शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाची समस्या गंभीर होत आहे. बोकाळलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होत आहेत. गत काही काळापासून शहरात अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम थंडावली होती. गुरूवारी दिवसभर चालणारी मोहीम गोंदिया पालिकेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. अतिक्रमणात अनेक पानठेले, चहा टपरी, तसेच लहान छोट्या दुकानदारांना हटविण्यात आले.अनेक व्यावसायिकांचे बाहेरचे टिनाचे शेडवर जेसीबीने झडप दिली. अनेकांचे शेड पाडले तर समोर आलेले अतिक्रमण हटविण्यात आले.या मोहीमेत जेसीबी, ट्रॅक्टर, आणि अन्य वाहन मदतीला होती. महिना भरापुर्वीच शहरातील 32 अतिक्रमणधरकांना नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावूनही अतिक्रमण काढण्यात न आल्याने अतिक्रमण निर्मुलन मोहिम सुरू करण्यात आल्याचे गोंदिया पालिकेच्या अभियंत्या डॉली मदान यांनी सांगीतले. अतिक्रमणामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना हा रस्ता आहे की गल्ली असा भास होत होता. अतिक्रमण काढताच रस्त्याची रूंदी वाढली आणि वाहतुकीचीही समस्या मार्गी लागल्याच्या प्रतिक्रीया या भागातील नागरिक देत आहेत. पालिकेच्यावतीने ही मोहीम अशीच सुरू ठेवावी, अशी मागणी देखील होत आहे.