एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी भंडारा जिल्ह्याला प्रथम क्रमांक

0
26

Ø  आज पुणे येथील प्रशिक्षणात आरोग्य संचालकांच्या हस्ते मिळाला पुरस्कार

भंडारा, दि. 4 : एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये राज्यात भंडारा जिल्ह्याला आज प्रथम क्रमांकाने पुरस्कृत करण्यात आले. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत 4 व 5 मे या दोन दिवशी पुणे येथे आयोजित कार्यशाळेत आज संचालक आरोग्य सेवा, पुणे डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ.स्वप्निल लाडे, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच जिल्ह्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक भंडारा जिल्ह्याने पटकावला.

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची अमंलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, डॉ. निखील डोकरीमारे, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर, सुनीता मेहेर, दामोधर मांढरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. हा पुरस्कार या सर्वेक्षण कार्यक्रमाची ऑनलाईन पोर्टलवर एस-फॉर्म,एल-फॉर्म, यांची पोर्टलवर दैंनदिन रूग्ण संख्या अद्ययावत करणे, कोविड हॉटस्पॉटची माहिती देणे यासह अन्य तांत्रिक निर्देशांकावर करण्यात आली आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, शल्य चिकित्सक डॉ. रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर यांच्या मार्गदर्शनात सर्व आरोग्य यंत्रणेने सामुहिक प्रयत्न केले असून त्यांचेच यश म्हणून जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. व्दितीय पुरस्कार गोंदिया, तिसरा लातूर, चौथा गडचिरोली तर पाचवा सांगली जिल्ह्याला देण्यात आला.