राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमित जागेवर विज पुरवठा

0
27

महावितरण कंपनीचा अजब कारभार

देसाईगंज दि २४- सर्व सामान्य माणसाला वीजपुरवठा करण्यासाठी वीज मीटर लावण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जाचक अटी व शर्ती लादुन नाकीनऊ आणले जाते. मात्र, देसाईगंज शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमित जागेवर अतिक्रमणधारकावर फारच मेहरबानी दाखवत चक्क वीज मीटर देऊन अतिक्रमणाला खत पाणी दिल्याने सर्व सामान्य नागरिकांमध्ये तिव्र असंतोष खदखदत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून रहिवासी अथवा व्यावसायिक प्रयोजनार्थ वीज मीटर लावण्यासाठी अर्ज दाखल करताना ज्या जागेवर वीज मीटर लावायचा आहे, त्या जागेचे मालकी कागदपत्रे असणे अत्यावश्यक असते, या सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अशा जाचक अटी व शर्ती चे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच लाईनमनचा निरिक्षण अहवाल , कनिष्ठ अभियंताचा निरिक्षण अहवाल सादर झाल्यानंतर लाभार्थीला सर्व प्रथम डिमांड दिल्या जाऊन बय्राच दिवसांनी वीज मीटर दिल्या जाते.
तथापि, साकोली- वडसा- आरमोरी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी या महामार्गावर केलेल्या अनाधिकृत अतिक्रमण धारकांकडे जमीन मालकीची कागदपत्रे नाहीच, या शिवाय देसाईगंज नगर परिषदचे ना हरकत प्रमाणपत्र देखील नाही, तरीही, प्रत्येक अतिक्रमण धारकांकडे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा व्यावसायिक प्रयोजनार्थ वीज मीटर लावण्यात आले कसे ? असा प्रश्न शहरातील सर्व सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी प्रयोजनार्थ वीज मीटर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी अर्ज सादर केले असून प्रलंबित आहेत. मात्र, वीज मीटर नसल्याची सबब पुढे करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. परंतु, जमिनी बाबतीत कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसताना,स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र सादर केले नसताना देखील वीज मीटर दिल्याची माहिती उघडकीस आल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे.