**तालुक्यात कुठे काय चालु तहसिलदारांना माहितीच नाही?
*दररोज शासनाचे महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना
सडक अर्जुनी:--अर्जुनी मोरगाव कार्यक्षेत्रांतर्गत येणा-या सडक अर्जुनी तालुक्यातून दररोज दिवसाढवळ्या खुलेआम रेती व मुरूमाचा विविध ठिकाणावरून उपसा जोमात सुरू आहे.त्यामुळे शासनाला दररोज लाखो रुपयांचा चुना लागत आहे.व शासनाचा महसूल बुडविला जात आहे. तालुक्यात रेती व मुरूमाचा अवैध उपसा सुरू असून तहसिलदारांना याबाबत कुठे काय चालु आहे याची माहितीच नाही? त्यामुळे तालुक्यात महसूल चोरी जोमात सुरू आहे.
यापूर्वी सुद्धा असलेल्या तहसिलदारांनी अवैध रेती उत्खनन करणा-यांना सहकार्य केल्याबद्दल एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्याची वृत्तपत्रातील बातमीतून समोर आली होती.
आजघडीला तालुक्यातील तेली घाटबोरी,फुटाळा, पिपरी,सौंदड,पळसगांव,भदुटोला,परसोडी,वडेगाव,डोंगरगाव,खजरी, माहुली,रेंगेपार, पांढरी,डव्वा, कोहमारा,बाम्हणी सह अनेक वनविभागाचे व महसूल विभागाचे जागेतून रेती व मुरूमाचा विनापरवाना अवैधरित्या उपसा करुन वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.तालुक्यात सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत एका अर्जदाराने स्थानिक तहसिलदारांना तालुक्यात किती ठिकाणाहून रेती व मुरूम उपसा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.आणि कुठून उपसा करणे आहे,त्यावर किती राॅयल्टी देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात महसूल वाहतूक करणाऱ्या किती वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचेवर किती दंड आकारण्यात आलेला आहे आणि किती दंड वसुली करणे आहे, याबाबत माहिती विचारली असता तहसिलदारांचे पत्रातून कोणतेही उत्तर मिळाले नाही.उलट जिल्हा कार्यालयातून याबाबत माहिती घ्यावी असे पत्रात नमूद आहे.एकंदरीत तहसिलदारांना त्यांचे कार्यक्षेत्रात कुठे आणि किती राॅयल्टी देण्यात आली याबाबत कोणतीही माहिती नाही असे पत्रातून दिसून येते.त्यामुळे तालुक्यात असलेल्या अवैध उपसा आणि वाहतुकीवर तहसिलदारांनी काय कारवाई केली हे पाहणे आहे.अवैध उपसा करणाऱ्यांना खुली सुट देण्यात आली की काय हाच संशोधनाचा विषय आहे.एकंदरीत महसुल विभागाचे आशिर्वादानेच हा सर्व प्रकार तालुक्यात सुरू आहे अशी नागरिकांत चर्चा आहे.
सडक अर्जुनी तालुक्यात अर्जुनी मोरगाव चे उपविभागीय अधिकारी येऊन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंडात्मक कारवाई करतात .मात्र तहसिलदार आपले कार्यक्षेत्रात अवैध रेती व मुरूम उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करतांना दिसत नाही.त्यामुळे तालुक्यात महसूल चोरी जोमात सुरू आहे.तहसिल कार्यालयातील कारकून अवैध उपसा होत असलेल्या ठिकाणी जाऊन रेती व मुरुम उपसा करणाऱ्या वाहनाकडून पैसै घेऊन उपसा करण्यास सांगतात. अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये व वाहनधारकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.तहसिल कार्यालयाचा कारभार कारकूनाचे भरवशावर असून उपसा होत असलेल्या ठिकाणी जाऊन वाहनधारकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अवैध उपसा करण्यास सहकार्य करत असल्याने तालुक्यात विनापरवाना रेती व मुरूमाचा अवैध उपसा खुलेआम जोमात सुरू आहे.त्यामुळे शासनाला दररोज लाखो रुपयांचा चुना लागत असून महसूल बुडविला जात आहे.