उपजिल्हा रुग्णालयातील मुदतबाह्य औषधे गटारात

0
16

चंद्रपूर- मुदतबाह्य औषधे निकाली काढण्याची व त्या औषधांना नष्ट करण्याची विशिष्ट पद्धत असते. ही औषधे नष्ट करण्यासाठी शासनाने काही निकष व नियम घालून दिले असून, त्या पद्धतीनेच मुदतबाह्य औषधे नष्ट करणे अनिवार्य असते. औषधं नष्ट करण्यासाठी सर्व रुग्णालये मग ती खासगी असो वा शासकीय सर्वांनाच या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. केवळ मुदतबाह्य औषधं नाही तर वैद्यकीय सेवा देताना निर्माण होणारा सर्व प्रकारचा कचरा मग त्यात वापरलेल्या सुया असो वा सलाईन असो कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय कचरा बाहेर टाकता येत नाही. तर शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे त्याची विल्हेवाट लावावी लागते.
शासनाच्या या नियमांना अधिन राहून वैद्यकीय कचरा नष्ट करणे गरजेचे असताना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मात्र मुदतबाह्य औषधे जुन्या वापरात नसलेल्या सदनिकांच्या (क्वार्टर) शौचालयाच्या गटारात आढळून आली. तर मुदतबाह्य गोळ्यांचा साठा जाळण्यात आल्याचेदेखील आढळून आले. राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील वापरात नसलेल्या सदनिकांच्या शौचालयाच्या गटारात न वापरलेल्या परंतु मुदतबाह्य झालेल्या इंजेक्शन व औषधांच्या बाटल्या गेल्याच कशा? हा मुख्य प्रश्न असून दवाखान्याच्या औषध निर्मात्यांचे (फार्मसिस्ट) या बाबीकडे असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब आहे.
वास्तविक बघता ही मुदतबाह्य औषधे नेमून दिलेल्या संस्थेकडे देऊन त्यांच्यामार्फत नष्ट करण्याची पद्धत असून, यासाठी त्या संस्थेला शुल्क दिल्या जाते. मात्र, असे असूनही मुदतबाह्य औषधे गटारात टाकण्याचे कारण काय, याचा शोध घेणे गरजेचे आहे.