गोंदिया,दि.30 : यंदाच्या रब्बी हंगामात केंद्र व राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात धान खरेदी सुरू झालेली नाही. सर्व जाचक अटी रद्द करून शेतकर्यांचे धान खरेदी करण्यात यावे, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी आज ३० मे रोजी ओबीसी संघर्ष समिती तालुका सालेकसाच्या वतीने सालेकसा येथील बस स्थानकासमोर धान खरेदीच्या मुख्य मागणीला घेवून आंदोलन करण्यात आले. दरम्यान तीन तास शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे तालुका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी करावयाची ऑनलाईन नोंदणीची मुदत ३० एप्रिल होती तर दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपुन शेतकर्यांची नोंदणी झाली तर दुसरीकडे आधारभूत केंद्र सुरू झाले नाही. या काळात नेते मंडळी सत्ता स्थापनेत व्यस्त होते. जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी धान खरेदी करीता सातबारा ऑनलाइन झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यातच सध्या प्रति हेक्टरी ८ क्विंटल ची अट ठेवण्यात आलेली आहे व धानाची उपज प्रति हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे झालेली आहे. त्यासाठी प्रति हेक्टरी ८ क्विंटल ची अट रद्द करून त्या एवजी प्रति हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे करणे व धान खरेदी करण्याची अंतिम मुद्दत वाढविण्यात यावे, त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, शेतकर्यांचे बारदाने रकमेसह परत देण्यात यावे, तसेच नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना त्वरित प्रोत्साहन अनुदान देण्यात यावा, तसेच धान खरेदीची मुदत वाढविण्यात यावी, या मागणीला घेवून हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी आधारभूत किंमतीवर अधिकृत केंद्रावर हेक्टरी फक्त ८ क्विंटल धान विकू शकणार असे आदेश काढले. जेव्हा शेतकर्यांकडे एकरी २० क्विंटल उत्पादन असतांना बाकी धान कोणत्या दरात व कोणाकडे विकणार असा सवाल उपस्थित झाला आहे. लागत मुल्य व किमान आधारभूत किंमत यांचा तुलनात्मक विचार केल्यास शेती परवडत नाही पण नाईलाजास्तव शेतकरी आर्थिक डबघाईस येत आहेत. तेव्हा प्रति हेक्टरी ८ क्विंटलची अट रद्द करून प्रति हेक्टरी ४० क्विंटल करण्यात यावी, धान खरेदी करण्याची अंतिम मुद्दत वाढविण्यात यावे, अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने निवेदनामार्फत करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जि.प.सदस्य विमल कटरे, लक्ष्मण नागपुरे, लता दोनोडे, ग्यानिदास महाराज, गुणवंत बिसेन, शंकर मडावी, रेखा फुंडे, अनिता चुटे, विना कटरे, शैलेश बहेकार, विजय फुंडे, मनोज डोये, संजय दोनोडे, युवराज कटरे यासह मोठ्या संख्येने शेतकरी व समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आमदार कोरेटेंनी थांबवले काँग्रेसच्या जि.प.सदस्यांनाः या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमगाव देवरी मतदारसंघातंर्गत येत असलेल्या सालेकसा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व काही काँग्रेस कमिटीचे सदस्य तयार होते.मात्र त्यांना या मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे यांनी हा काँग्रेसचा मोर्चा नाही,ओबीसी संघटनेचा आहे असे सांगत त्यांना जाण्यास मज्जाव घातल्याची एकच चर्चा आता मतदारसंघात सुरु झाली आहे.या आंदोलनात नेहमी आम्ही ओबीसीसाठी अग्रसर असल्याचे चित्र प्रसारमाध्यमात दाखविणार्या नवनिर्वाचित जि.प.सदस्य व महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना काळे,जि.प.सदस्य छाया नागपूरे यांच्यासह अनेकानी या मोर्च्याकडे पाठ फिरवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस,भाजपच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावून आम्ही ओबीसी असल्याचे दाखविले.ज्यांनी पाठ फिरवली त्यांच्याबद्दल मात्र ओबीसीचा ढोंगीपणा असल्याची चर्चा सुरु होती.