प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी साधला विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद

0
38

* लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम

* पंचायत समिती सभागृहात आयोजन

* जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा ऑनलाईन सहभाग

* सरपंचांचा सत्कार

गोंदिया, दि. 31 : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासनाने आज लाभार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तर दुपारी 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथील आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य, जिल्हास्तरावर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांसह 13 योजनांच्या निवडक लाभार्थ्यांशी संवाद साधला.

            जिल्हास्तरावर यासाठी गोंदिया येथे पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, गोंदिया पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर व कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक विशाल उबरहंडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध योजनेतील लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते. लाभार्थ्यासोबतच विविध लोकप्रतिनिधींना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते.

            या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक राशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत योजना, आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजनांमधील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी संवाद साधला.

            या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात आला. देशातील 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21 कोटी रुपये ऑनलाईन हस्तांतरित करण्यात आले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये विविध सोशल मीडीया व्टिटर, फेसबुक, यु – ट्युब आदी चॅनेलवर हा कार्यक्रम लॉईव्ह प्रसारित करण्यात आला.

            राज्य शासनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी तसेच योजनाच्या यशस्वीतेसंदर्भात लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही संवाद झाला. विविध जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी व लाभार्थी यामध्ये सहभागी होते.

*  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला लाभार्थीशी संवाद *

योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पक्षभेद विसरूनआणि राजकारणविरहित प्रयत्न झाले पाहिजेत आणि मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरीत्या पोहचविल्या.

 *सरपंचांचा सत्कार*

विविध योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील सरपंचांचा या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नयना गुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अजय अंबादे, कमलेश्वरी भिलावे, एस. एम. भांडारकर, तेजेंद्र हरिनखेडे, बद्रीप्रसाद दशरिया, जीवनलाल लांजे, राजेंद्र चामट, नितीन टेंभडे, सोनू घरडे व शंकरलाल टेंभडे यांचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्या पत्नी कौशल्याबाई कापगते यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.