46 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मान्य
गोंदिया, दि.1 : पाणी टंचाई कृती आराखड्याअंतर्गत गोंदिया जिल्हा कार्यक्षेत्रात गाळ साचल्याने बंद स्थितीत असलेल्या विंधन विहिरी तसेच हातपंपाचे ओटे तुटल्याने वापर नसलेल्या विहिरींची ओटे दुरुस्ती करून पुर्नजीवीत करण्याच्या 46 लाख 9 हजार 532 रुपये किमतीच्या 193 कामांना जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या कामामुळे विंधन विहरी पुर्नजीवीत होऊन जलस्तर वाढण्यासाठी मदत होणार आहे.
पाणी टंचाई कृती आराखडा 2021-22 टप्पा-2 अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी व गोंदिया तालुक्यातील 193 गावे व ग्राम पंचायत मधील विंधन विहिरींना प्लशिंग सफाई करून तुटलेले ओटे दुरुस्ती करून पुर्नजीवीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी शिफारशीसह प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी 30 मे 2022 रोजी एका आदेशाद्वारे मान्यता प्रदान केली आहे.
सडक अर्जुनी 77 प्रस्ताव किंमत 18 लाख 91 हजार 669 रुपये, गोरेगाव 32 कामे किंमत 9 लाख 18 हजार 536 रुपये, देवरी 39 कामे किंमत 7 लाख 39 हजार 211 रुपये व गोंदिया 45 कामे किंमत 10 लाख 60 हजार 116 रुपये आदी कामांचा यात समावेश आहे. काही अटी व शर्थी टाकून ही मान्यता देण्यात आली आहे.
उपाययोजना राबवितांना 3 फेब्रुवारी 1999 चे शासन निर्णयात शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी, निकष व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे करण्यात यावे. पाण्याच्या उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा गोंदिया यांचेकडून प्रमाणपत्र घेण्यात यावे. सदरहू कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरीही आवश्यक असल्यास सदरहू कामे घेण्यात यावी. मंजूर योजना त्वरित पूर्ण करून व कार्यान्वित करून सुरू होताच तसा अहवाल पाठवावा. तसेच प्रगतीबाबत साप्ताहिक अहवाल पाठवावा. उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद व तहसीलदार यांनी या कामांवर नियंत्रण व देखरेख ठेवावी. वरील प्रदान केलेल्या उपाययोजनांशी संबंधित सर्व माहिती तसेच शासनाने मागितलेली माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांची राहणार आहे.