शौचालय हवे, ऑनलाईन मागणी करा!

0
126

मुकाअ यांचे आवाहन : घरबसल्या करता येणार ऑनलाईन नोंदणी
——-
गोंदिया, ता. 10 : मागेल त्याला शौचालय देवून प्रत्येक कुटूंबाला उघडयावर शौच करण्यापासून परावृत्त करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसारच आता गावातील शौचालय नसलेल्या कुटूंबाना शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाची थेट ऑनलाईन मागणी करता येणार असून, शौचालयाची ऑनलाईन मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
गाव हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी शासनस्तरावरून विशेष प्रयत्न केले जातात. कोणताही व्यक्ती उघडयावर शौचास बसू नये, यासाठी मागेल त्याला शौचालय देण्याचे शासनाचे धोरण आहे. शौचालय हवे असल्यास लाभार्थ्याला ग्रामपंचायतीला लेखी मागणी करावी लागत असे. शौचालय मागणी केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीचे ग्रामसभेत वाचन करून नंतरच ते मंजूरीला पाठविण्यात येत होते. या सगळया प्रक्रियेमध्ये बराच कालावधी लागत होता. दरम्यान आपले शौचालय मंजूर झाले अथवा नाही, याची माहिती सुध्दा लाभार्थ्यांना राहत नव्हती. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावात लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करण्यास सांगण्यात आल्यानंतरच शौचालयाच्या बांधकामाला सुरवात व्हायची. मात्र, शौचालयाचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत तात्काळ पोहचावा, यासाठी शासनाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. त्यामुळे आता शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या sbm.gov.in या संकेतस्थळावर आपली नोंदणी करून शौचालयाची मागणी करता येणार आहे. ऑनलाईन माहिती भरतांना आधार कार्डासह बॅकेचे विवरण व पासबुक सुध्दा अपलोड करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात शौचालयांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जाणार आहे. गावातील एकही व्यक्ती उघडयावर जाणार नाही, यासाठी गावकऱ्यांनी शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाची मागणी करावी, ग्रामपंचायतींनी सुध्दा गावकऱ्यापर्यंत ऑनलाईन शौचालय मागणीची माहिती पोचविण्याचे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.