आमदार कोरोटे यांची माहिती.
देवरी, ता.12: आदिवासीचे श्रद्धास्थान आणि धर्मसंस्कृतीचे प्रतिक असलेले सालेकसा तालुक्यातील सुप्रसिद्ध कचारगडचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे देवरी-आमगाव विधानसभाक्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी म्हटले आहे. यासाठी राज्याचे ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार श्रीवास्तव यांची भेट घेत विकास आराखडा सादर केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सालेकसा तालुक्यातील धनेगाव/कचारगड येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत पारी कोपार लिंगो, महाकाली कंकाली हे देवस्थान महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी यात्रेत दरवर्षी भाविक लाखोच्या संख्येने भेट देवून आपल्या आराध्यांचे दर्शन घेतात.
परंतु, या ठिकाणी योग्य सोईसुविधांचा अभाव असल्याने भाविकांची गैरसोय होते. यासाठी श्री कोरोटे यांनी ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार श्रीवास्तव यांची मुंबई मंत्रालयात शुक्रवारी रोजी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शासनस्तरावर प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करीत आदिवासी धर्मसंस्कृतीचे जतन करणाऱ्या कचारगड(धन्नेगाव) या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची विनंती आमदार कोरोटे यांनी केली.
कचारगड या तीर्थक्षेत्राचा सर्वांगिण विकास आराखडा गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तयार केला असून येथे धर्मशाळा, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, विजेची सोय, समाजभवन, बसण्याची सोय व सौंदर्यकरण अशा अनेक विकास कामाचा यात समावेश आहे. या आराखड्यास शासनस्तावर मंजुरी मिळण्याकरिता गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात लवकर एका उच्चाधिकार बैठकीचे आयोजन श्री श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात य़ेणार आहे.