मौदा,दि.17ः- शेतकर्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शासन करोडो रुपये शेतातील बंधारा व नाला खोलिकरणासाठी खर्च करतो. केलेले काम बरोबर असल्यास शेतकर्यांचेही समाधान होते. त्यातूनच शेतकर्यांना विकास साध्य करता येते. एखादे केलेले काम थातूरमातूर झाले तर तो नक्कीच निकृष्ट दर्जाचा समजला जावा, असाच प्रकार मौदा तालुक्यातील तांडा येथे समोर आला आहे.
मौदा तालुक्यातील तांडा येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधारा बांधकामासाठी ९0 लाख रुपये मंजूर होऊन मोठय़ा थाटात उद््घाटन करण्यात आले. आता या नालाखोलीकरण व बंधार्याचे काम थातूरमातूर करून या कामाचे कुठल्याही ठिकाणी फलक न लावता भूमिपूजन पार पडले व ठेकेदारांनी हे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप येथील शेतकर्यांचा आहे. ५00 मीटरचे अंतर नाला खोलीकरण करताना नाल्यातील संपूर्ण माती जेसीबीद्वारे ठेकेदाराने शेतकर्यांच्या धुर्यांवर दोन्ही बाजूला समान न टाकता त्या मातीचा भरणा काही शेतकर्यांच्या धुर्यावर टाकला, तर काहींच्या धुर्यांवर टाकण्यात आली नाही. ठेकेदाराच्या कामचुकारपणा नक्कीच ठेकेदारांना भोवणार असल्याचेही बोलले जात आहे. तर नाल्यातील ही माती शेतकर्यांच्या धुर्यावर टाकल्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील पाणी जाण्यास मार्गच ठेकेदारांनी सिमेंटच्या पाहिल्या न टाकताच बंद करून टाकला व ठेकेदाराने शेतकर्यांमध्ये भांडणे लावण्याचे काम तांडा येथे केले असल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे.
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, पावसाळासुद्धा सुरू झाला आहे. नाला खोलीकरणादरम्यान शेतकर्यांना पाणी जाण्यासाठी सिमेंटच्या पाहिल्या टाकून देतो म्हणून ठेकेदारांनी सांगितले होते. त्यावर शेतकरी ठाम राहिले. आता काम पूर्ण होऊनही पायल्या न टाकता ठेकेदार काम पूर्ण करून निघून गेले. आता पावसाचे पाणी शेतकर्यांच्या बांधावरच अडून राहणार असून, या शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. या हंगामात शेतकर्यांना पीक घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. पावसाचे पाणी काढावे कुठून? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. या कामाची तत्काळ वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी करून चौकशी करावी. सदर कामात हेराफेरी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी तांडा येथील शेतकरी श्यामराव डोरले, चंद्रभान डोरले, तुलाराम झिंगरे, शंकर वालदे, भोजराज झिंगरे, नरेंद्र गजभिये या शेतकर्यांनी केली आहे.
भूमिपूजन करतेवेळी मला बोलाविण्यात आले होते. काम सुरू झाल्यानंतर मला काही शेतकर्यांनी हे काम बरोबर होत नाही म्हणून हटकले. मी याबाबत सुपर वायझर यांना विचारणा केली असता मलाच उलट-सुलट संबंधिताकडून उत्तरे देण्यात आली.
-मनोरमा डोरले ,सरपंच, तांडा |