वीज पडणे व पूर परिस्थितीच्या आपत्ती प्रसंगी काय करावे व काय करू नये

0
77

याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 वाशिम, दि.१७  : मान्सून काळात विज पडणे/वज्राघात होणे याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे जीवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यात याबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहे. नागरिकांनी आवश्यक दक्षता घेण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आवाहन करण्यात आले आहे.

          काय करावे- वादळी वारा, वीज चमकत असल्यास, घरात असल्यास घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवा. घराचे दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दूर राहा. मेघगर्जना झाल्यापासून तीस मिनीटे घरातच राहा. घराबाहेर असल्यास सुरक्षित निवारा शोधून तिथे थांबा. ट्रॅक्टर, सायकल, बाईक, शेती अवजारे यांच्यापासून दूर राहा. गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी थांबा. उघड्यावर असाल व सुरक्षित निवारा जवळपास नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांत झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या व लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून दूर राहा. जंगलात असाल तर दाट, लहान झाडाखाली व उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर दरीसारख्या खोलगट जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.

         वज्राघात झाल्यास- दुर्देवाने वीज पडल्यास बाधित व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमीनीमध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा. जेणेकरून हायपोथेरमियाचा (शरीराचे अतिकमी तापमान) धोका कमी होईल. इजा झालेल्या व्यक्तीचे श्वसन बंद झाल्यास तोंडावाटे पुनरुत्थान (माऊथ टू माऊथ) प्रक्रिया अवलंबावी. हृदयाचे ठोके बंद झाल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआरचा वापर करुन सुरु ठेवावी.

         काय करू नये- गडगडाटीचे वादळ आल्यास उंच जागांवर, टेकड्यांवर, मोकळ्या जागांवर, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, वीजेचे खांब, उघडी वाहने, पाणी आदी ठिकाणे टाळावीत. घरात असाल तर फोन, मोबाईल, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वीज जोडणीला लावू नये. विजा चमकताना व गडगडाट असेल तर वीज उपकरणांचा वापर टाळा. अशावेळी आंघोळ करणे, हात धुणे, भांडी किंवा कपडे धुणे टाळा. काँक्रिटच्या ठोस जमीनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. धातुची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरिंग, इलेक्ट्रिक मीटर आदी प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा. घराबाहेर असाल तर मेघगर्जनेच्या वेळी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लोंबकळणाऱ्या वीजेच्या किंवा कुठल्याही तारेपासून लांब राहा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम यांनी केले आहे.