पोलीस आयुक्तालयात पत्रकापरिषद घेणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा… – ज्वाला धोटेंचा इशारा!

0
30

गंजाजमुनातील पोलीस बंदोबस्त हटविण्यात यावा, या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांना पोलिसांनी आयुक्तलायाच्या आवारातच अडविले. त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आयुक्तालयाच्या आवारातच त्यांना अधिकाऱ्यांना निवेदन द्यावे लागले. तर, “पोलीस आयुक्तालयात पत्रकारपरिषद घेणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा सोमवारपासून आयुक्तालयाच्या आवारातच आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.” यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आयुक्तालयात लावण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रीला व्यवसायाचा दर्जा दिल्यामुळे गंगाजमुनातील पोलीस बंदोबस्त लावणे हा तेथील महिलांच्या उपजिविकेवर घाला घालण्यासारखे आहे. त्यामुळे गंगाजमुनातील महिलांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, या मागणीसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी ज्वाला धोटे या २० ते २५ कार्यकर्त्यांसह आज (शनिवार) दुपारी दीड वाजता आयुक्तालयात पोहचल्या. त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. ज्वाला यांना प्रवेशद्वारासमोरील आवारातच पोलिसांनी अडवले. पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात जाऊ देण्याची विनंती ज्वाला यांनी केली असता, पोलिसांनी आयुक्त कार्यालयात जाण्यास मनाई केली. त्यांचे निवेदन पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी आवारातच स्वीकारले आणि त्यांना आल्या पावली परत जाण्यास सांगितले. त्यामुळे ज्वाला धोटे यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला.

शासकीय इमारतीत पत्रकारपरिषद कशी? –

“पोलीस आयुक्तांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे यांना पोलीस आयुक्तालयात पत्रकारपरिषद घेऊ दिली. त्यामुळे मी सुद्धा आयुक्तांना निवेदन देऊन आयुक्तालयातच पत्रकारपरिषद घेणार होते. परंतु, भावी गृहमंत्री असलेल्या बावनकुळेंना आयुक्तालयात सुविधा, तर सामान्यांना कार्यालयाची पायरीसुद्धा चढू दिली नाही.” असे ज्वाला धोटे म्हणाल्या.