
भंडारा -: देशप्रेमी भारतीय तरुणांची फसवणूक करणारी व भविष्य धोक्यात घालणारी केंद्र सरकारची अग्निपथ योजना मागे घ्या आणि भंडारा शहराचा पाणीप्रश्न, अतिक्रमित घरकुल धारकांच्या पट्ट्याच्या प्रश्न त्वरित सोडवून आवास योजनेचा लाभ द्या अशी मागणी भाकप व आयटकचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे समन्वयक कॉम्रेड हिवराज उके यांनी केली.
22 जूनला भाकप आयटक व ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काॅ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात व कॉम्रेड प्रितेश धारगावे, प्रेरणा सिंगन जुडे, मीनाक्षी मेहर, गजानन पाचे, मंगला गजभिये,प्रियकला मेश्राम, महानंदा गजभिये व अंबूले काका यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. व प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विषयानुषंगाने काॅ.हिवराज उके यांचे मार्गदर्शन झाले.
तद्नंतर माननीय राष्ट्रपती, माननीय प्रधानमंत्री व माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने माननीय जिल्हाधिकारी यांना खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन माननीय साहेबराव राठोड अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी स्वीकारले.
निवेदनासोबत अतिक्रमित घरकुल धारकांचे पट्ट्यासाठी 83 वैयक्तिक अर्ज सादर करण्यात आले. अशाप्रकारे आतापर्यंत 704 अर्जाचा समावेश झाला आहे. निवेदनातील मागण्यात 1)अग्नीपथ योजना मागे घ्या. 2) रोजगाराच्या संवैधानिक हक्कासाठी भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा (बनेगा)करा. 3) भंडारा शहराची रखडलेली पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण करून फोडलेले रस्ते-रोड दुरुस्त करा व कामाची समयसीमा व जबाबदारी फिक्स करा. 4) आवास योजनेअंतर्गत बेघरांना घरे द्या आणि अतिक्रमित घरकुल धारकांना स्थायी मालकी पट्टे देऊन घरकुल चा लाभ द्या.
वरील मागण्यांची त्वरित पूर्तता करा अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असे आवाहन कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.
या आंदोलनात मोठ्या संख्येत एआयएसएफ चे विद्यार्थी, भाकपचे कार्यकर्ते आयटक तर्फे अंगणवाडी कर्मचारी व अतिक्रमित झोपडपट्टी धारक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने कॉम्रेड वामनराव चांदेवार , गणेश चिचामे, दीपक गजभिये, राजगुरू बावनथडे, ताराचंद आंबाघरे, भाऊराव गिरेपुंजे,प्रणय बडवाईक, विश्वजीत बनकर ,नितीन सोनकुसरे ,आशिष कोहडे,वृषभ वाघमारे, शिवम तिडके, रामेश्वर निमजे, रवी बावणे, अक्षय सोनकुसरे ,सीमा फुले, विजयकांता रामटेके, अल्का सतदेवे, मानिका सतदेवे इत्यादींचा समावेश होता.