अर्जुनी-मोरगाव, दि.23 : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आज विजेच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात तालुक्यातील बोरटोला (सावरटोला ) येथील पवन मनोहर गुढेवार या 27 वर्षीय अविवाहित युवकाचा घराजवळील शेतात काम करीत असताना अचानक वीज पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज 23 जून रोजी दुपारी 2:30 वाजता घडली.
सदर युवक बी.ए. शिकलेला असून तो स्वतःच्या शेतीत काम करायचा. तो आईवडीलाचा एकुलता एक मुलगा होता. तालुक्यात आज दुपारी एक वाजतापासूनच विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या प-हे पेरणीचा हंगाम सुरु असल्याने बहुतांशी शेतकरी शेतात काम करीत असतात. अशातच दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान बोरटोला शेतशिवारात वीज पडल्याने 27 वर्षीय अविवाहित युवक पवनकुमार मनोहर गुडेवार यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आईवडील, दोन बहिणी व बराच मोठा परिवार आहे. स्थानिक तलाठी यांनी पंचनामा करुन आपला अहवाल तहसील कार्यालय येथे सादर केला आहे. पवन गुढेवार याच्या मृत्युमुळे गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.