गोरेगाव येथील कटंगी जलाशयात बोटींची तपासणी व पूर परिस्थिती सराव प्रशिक्षण

0
29

  गोंदिया,दि.1 : जिल्ह्यात पूर परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे पूर परिस्थितीमध्ये शोध बचाव कार्य करण्याकरिता वापरात येणाऱ्या ओ.बी.एम (बोटीचे इंजिन) व बोटींची तसेच इतर आवश्यक साहित्यांची चाचणी गोरेगाव येथील कटंगी डॅममध्ये दि.1 जुलै 2022 रोजी जिल्हा शोध व बचाव पथकामार्फत करण्यात आली.

        यापूर्वी जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी जिल्हा प्रशासनाकडून पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया मार्फत जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नागरिकांना पूरपरिस्थितीमध्ये तात्काळ मदत पुरविण्यासाठी जिल्हा शोध व बचाव चमू तर्फे नियमित सराव प्रशिक्षण कार्यक्रमाचे देखील आयोजन कटंगी जलाशय येथे करण्यात आले.

        जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाला आहे.  जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी पडणारे रबर/फायबर बोटी, लाइफ जॉकेट, लाइफ बॉय, इमरजेंसी लाईट, OBM मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस, सर्चलाईट इत्यादी सर्व साहित्यांचे चाचणी करून कार्यरत असल्याची खात्री करण्यात आली आहे.

         गोरेगाव येथील कटंगी जलाशय येथे शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उईके, राजकुमार खोटेले,  जसवंत रहांगडाले, रविंद्र भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, राजाराम गायकवाड, महेंद्र ताजने, दुर्गप्रसाद गगंगापारी, मनोज केवट, इंद्रकुमार बिसेन इत्यादी उपस्थित होते.

        जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती (SOP) व पूर दरम्यान संबंधित सर्व विभागांचे समन्वय इत्यादी बाबत आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

पूर नियंत्रणासाठी आंतरराज्यीय समिती कार्यान्वित

          यावर्षी पूर परिस्थिती लक्षात घेता विभागीय आयुक्त नागपूर व जबलपूर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा शिवनी, छिंदवाडा, बालाघाट तसेच महाराष्ट्र राज्यातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व नागपूर जिल्ह्यांची आंतरराज्यीय पूर नियंत्रण समितीची सभा  घेण्यात आली आहे. सदर सभेत मध्यप्रदेश येथील संजय सरोवर येथून वैनगंगा नदीच्या मार्फत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाच्या परिचालन करण्यासंबंधी तसेच धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी पूर्व सूचना व सर्व संबंधित जिल्ह्यांचे एकमेकांशी समन्वय साधण्याकरिता महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. या दरम्यान मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील धरण व नद्यांची सद्यस्थिती व पूर परिस्थिती दरम्यान संबंधित यंत्रणेला सुसज्ज ठेवणे संबंधी माहिती देण्यात आली आहे. म्हणून यावर्षी पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज आहे.