सडक अर्जुनी-. तालुक्यातील सौंदड रेल्वे स्थानकावर जबलपूर-चंद्रपूर एक्स्प्रेस गाडीचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदनातून केली आहे.
गोंदिया-जबलपूर-चंद्रपूर रेल्वे मार्गावर जबलपूर-चंद्रपूर गाडी क्रमांक 22174/22173 एक्स्प्रेस गाडी 30 जूनपासून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार अशी एक्स्प्रेस गाडी पुन्हा कोरोना काळ संपल्यानंतर सुरू करण्यात आली नाही. या गाडीचा थांबा बालाघाट, नैनपूर या ठिकाणी दिलेला आहे. परंतु, गोंदिया-चंद्रपूर हे अंतर 240 किमी असून या संपूर्ण रेल्वे मार्गावर नागभीड, वडसा, मूल, सौंदड, अर्जुनी मोरगाव, सिंदेवाही हे प्रमुख रेल्वे स्थानक आहेत. या मार्गावर नागझिरा, ताडोबा, नवेगावबांध अभयारण्य असून अनेक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतापगड, मार्कंड, गोठणगाव, इटियाडोह जलाशय आहेत. तसेच गोंदिया, गडचिरोली अतिशय दुर्गम नक्षलग्रस्त भागातून लोक उत्तर-दक्षिण दिशेकडील शहरांकडे मजुरीच्या शोधात जातात. त्यामुळे अशा लोकांच्या दृष्टीने सौंदड, अर्जुनी मोरगाव या रेल्वे स्थानकावर जबलपूर-चंद्रपूर गाडी क्रमांक 22174/22173 एक्स्प्रेस गाडीचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी सडक अर्जुनीचे भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे यांनी केली आहे.