ओझाटोला-फत्तेपूर मार्गावरील पुलाची दुरवस्था

0
13

गोंदिया,- तालुक्यातील ओझाटोला ते फत्तेपूर या मार्गावर पूल असून या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. या पुलाच्या मधोमध खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहन चालकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पुलावरील पडलेले खड्डे बुजविण्यात यावे व पुलाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी फत्तेपूरचे उपसरपंच धनंजय रिनायत यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
ओझाटोला ते फत्तेपूर मार्गावर पूल आहे. या पुलाच्या मध्य भागात खड्डे पडले असून दुरवस्था झाली आहे. ओझाटोला, फत्तेपूर व परिसरातील गावातील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी या पुलावरून डोंगरगाव येथे शिक्षण घेण्यासाठी प्रवास करतात. तसेच याच मार्गाने मानव विकासची बसही चालते. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी पुलावरून वाहते. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर पूल जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून अनेकदा उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. धनंजय रिनायत व नागरिकांनी या पुलाची उंची वाढवावी व दुरूस्ती करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले दिले आहे.