पशुवैद्यकीय दवाखान्यातील गैरप्रकार उघडकीस

0
27

व्यथा ग्राम कोसमतोंडीची

*शासकीय साहित्याची चपराश्यांनेच लावली वाट*
*स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार *
सडक अर्जुनी:–तालुक्यातील कोसमतोंडी येथील व संपूर्ण परिसरातील जनावरांसाठी उपलब्ध असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक समस्या असून या दवाखान्यातील कर्मचाऱ्याचे शासकीय सामानाचे अफरातफरी चे गैरप्रकार उघडकीस आले आहे.
शासकीय पशु दवाखान्यात मागील अनेक वर्षे कोसमतोंडी येथे डॉक्टर नव्हते ,पण या दवाखान्याचा प्रभार सौंदड येथील डॉक्टर चन्ने यांच्याकडे होता. आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस प्रभारी डॉक्टर कोसमतोंडी येथे येत असत, त्यामुळे कोसमतोंडी व परिसरातील मुरपार, लेंडेझरी, धानोरी, चिचटोला, थाडेझरी, बोरुंळा गावातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. शेतकऱ्यांच्या जनावरांची गैरसोय व अडचण लक्षात घेता नागरिकांनी निवेदन देऊन या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर ची मागणी केली व ती पूर्णत्वास सुद्धा आली.
6 एप्रिल ला या दवाखान्यात डॉक्टर राऊत रुजू झाले पण रुजू होण्याआधी याच दवाखान्यातील चपराश्यांने या दवाखान्यात अनेक गैरप्रकार केल्याचे काही नागरिकांचे आरोप आहेत. दवाखान्यात डॉक्टरांनी नागरिकांना पूर्ण वेळ द्यावा यासाठी दवाखान्यातच डॉक्टरला राहता यावे म्हणून त्यांच्यासाठी निवासाची सोय शासनाने केलेली आहे .परंतु नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर राऊत यांनी दवाखान्यातील पाण्याची मोटार व निवासस्थानातील कुलर गायब असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आणून दिले आणि या संपूर्ण प्रकाराची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना फोन करून देण्यात आली. डॉक्टरांची निवास्थानी राहण्याची अडचण लक्षात घेता काही नागरिकांनी चपराश्याला तक्रारीचा धाक दाखवला असता त्याने पाण्याची मोटर व मोडकळीस आलेला कुलर आणून दिला. कुंपणच शेत खात असेल तर त्या शेताला कोणी वाचवू शकत नाही याप्रमाणेच डॉक्टरांच्या अनुपस्थितीत दवाखान्यातील शासकीय सामान विकणाऱ्या चपराश्यांवर कार्यवाही करून याला नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी व खंडविकास अधिकारी वाघाये यांच्याकडे केली आहे.
या दवाखान्यात येणाऱ्या औषधांच्या नोंदी योग्य प्रकारे केलेल्या नाहीत. अनेक औषधी परिसरातील प्रायव्हेट डॉक्टरांना विकल्या जाण्याच्या तक्रारी नागरिक करताना दिसत असून या दवाखान्यातील फ्रिज सुद्धा गायब आहे. पाण्याची मोठी टाकी सदर चपराश्याने विकल्याचे प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे. तक्रारीनंतर या चपराश्यावर काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया :-
*पाण्याची मोटर व कुलर नसल्याने होणाऱ्या गैरसोयीबद्दल डॉक्टर राऊत यांनी सांगितले होते. मी स्वतः ही बाब जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. मागच्या वेळी दवाखान्यातील फ्रिज चपराशी आपल्या मुंडीपार येथील राहत्या घरी घेऊन गेला होता व त्याची तक्रार सुद्धा करण्यात आली होती. अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल.*
– गौरेश बावनकर ( सामाजिक कार्यकर्ता कोसमतोंडी)

* अनेक औषधे ही थंड जागी ठेवणे अपेक्षित आहे यासाठी शासनाचा फ्रीज दवाखान्यात नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे व पाण्याची टाकी सुद्धा कबाडीत विकण्यात आली व पाईपलाईन झालेले पाईप काढून विकण्यात आले हे सत्य आहे.*
– सुभाष काशिवार (नागरिक)

* दवाखान्यातील फ्रिज सौंदड येथे नेण्यात आला आहे. मी रुजू झाल्यानंतर अडीच तीन महिने मला कुलर अभावी त्रास सहन करावा लागला व पिण्याच्या पाणी भरण्याची मोटर सुद्धा गायब होती. याची माहिती मी माझ्या वरिष्ठांना दिलेली आहे. -डॉक्टर राऊत (वैद्यकीय अधिकारी कोसमतोंडी)